तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केप्यातच हवे; कवळेकरांसह शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:09 IST2025-07-27T14:08:19+5:302025-07-27T14:09:19+5:30
केपेवासीयांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पर्वरी येथे भेट घेतली.

तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केप्यातच हवे; कवळेकरांसह शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : राज्यात तिसरा जिल्हा करण्याबाबत शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर कुडचडेत मुख्यालय करण्याचा विचार सुरू असताना तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपेमध्ये असावे, अशी मागणी करत काल केपेवासीयांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पर्वरी येथे भेट घेतली.
धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण मिळून हा जिल्हा बनवला जाणार आहे. शनिवारी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी केपे तालुक्यातील स्थानिक प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केप्यातच असावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच व प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता.
केपे तालुक्याला यापूर्वीच उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांसह प्रथमश्रेणी न्यायालय व सर्व महत्त्वाची प्रशासकीय कार्यालये केपे शहरातच असल्याने केपे येथेच जिल्हा मुख्यालय स्थापन करणे सर्वांना सोयीस्कर ठरेल, असे कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. कवळेकर यांचे म्हणणे ऐकून घेऊन या मागणीची आपण नोंद घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.