महागठबंधन हे पर्रीकरांचे पिल्लू
By Admin | Updated: December 1, 2015 01:58 IST2015-12-01T01:57:40+5:302015-12-01T01:58:01+5:30
पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व इतर विरोधी पक्ष महागठबंधन करतील, हे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

महागठबंधन हे पर्रीकरांचे पिल्लू
पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व इतर विरोधी पक्ष महागठबंधन करतील, हे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोडलेले पिल्लू असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी स्वबळावर उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महागठबंधन हा प्रकार आपण केवळ वृत्तपत्रातून आणि टीव्हीवरून ऐकत आहे. प्रत्यक्षात तसा कोणताही प्रस्ताव काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही. त्यामुळे महागठबंधनाचे पिल्लू हे भाजपनेच मुद्दामहून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सोडले आहे. अशा कामात भाजपचे नेते पर्रीकर हे माहिर आहेत आणि महागठबंधनाची आवईही त्यांनीच उठविलेली असेल.
माध्यम मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांना अनुदान देण्याच्या निर्णयामुळे पक्षासाठी हा मुद्दा संपलेला आहे, असे ते म्हणाले. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनाविषयी विचारले असता, त्यांनी ती भाजपचीच एक शाखा असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष देण्याची पक्षाला गरज नाही. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असला, तरी ती पर्रीकर यांचीच कोणती तरी चाल असावी, असाही दावा त्यांनी केला.
आपल्याला स्थानिक राजकारणात सक्रिय व्हायला आवडेल. सध्या फातोर्डा मतदारसंघात काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय सरदेसाई यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, सरदेसाई यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे काँग्रेसच्या हायकमांडला यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे फातोर्डा मतदारसंघासाठी काँग्रेस उमेदवाराच्या चाचपणीसाठी पक्षाने काहीच केले नव्हते; परंतु आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे काँग्रेसचे काम या मतदारसंघात जोमाने करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)