राज्यपाल राजीनामा देणार?
By Admin | Updated: June 25, 2014 17:29 IST2014-06-25T17:27:11+5:302014-06-25T17:29:13+5:30
पणजी : केंद्रात भाजपप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर आल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीत राज्यपाल भारतवीर वांच्छू हे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात,

राज्यपाल राजीनामा देणार?
पणजी : केंद्रात भाजपप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर आल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीत राज्यपाल भारतवीर वांच्छू हे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्यपाल वांच्छू यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली व त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली.
केंद्रात मोदी सरकार अधिकारावर आल्यानंतर देशातील काही राज्यपालांनी राजीनामे दिले. गोव्याचे राज्यपाल वांच्छू यांनी राजीनामा दिला नाही. प्रदेश भाजपने यापूर्वी दोन वर्षे राज्यपाल वांच्छू यांच्यावर कधी टीका केली नाही; पण आता अचानक वांच्छू यांनीही पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने सोमवारी पत्रकार परिषदेत केली. राज्यपाल आज मंगळवारी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार असल्याची पूर्वकल्पना भाजपला होती, असे सूत्रांनी सांगितले. वांच्छू पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून सिंग यांच्याशी त्यांनी त्याच दृष्टिकोनातून चर्चा केल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, वांच्छू हे विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) प्रमुख असताना काही वर्षांपूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणात साक्षीदार म्हणून सीबीआयकडून लवकरच वांच्छू यांचीही चौकशी केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सिंग यांच्याशी वांच्छू यांची त्या दृष्टीनेही चर्चा झाल्याचे कळते. (खास प्रतिनिधी)