सभापती निवडीसाठी २५ सप्टेंबर रोजी विशेष अधिवेशन; राज्यपालांनी जारी केली अधिसूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 11:09 IST2025-09-07T11:07:19+5:302025-09-07T11:09:27+5:30
याबाबतची अधिसूचना राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी जारी केली आहे.

सभापती निवडीसाठी २५ सप्टेंबर रोजी विशेष अधिवेशन; राज्यपालांनी जारी केली अधिसूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा विधानसभेच्या नव्या सभापतींची निवड करण्यासाठी गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी विशेष अधिवेशन सकाळी ११.३० वाजता होणार आहे. याबाबतची अधिसूचना राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी जारी केली आहे.
सभापतीपदासाठी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची निवड होऊ शकते. या पदासाठी त्यांचेच नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करताना तत्कालीन सभापती रमेश तवडकर यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सध्या सभापतिपद हे रिक्त आहे.
मंत्रिमंडळ फेरबदल करताना मंत्री रमेश तवडकर यांना कला व संस्कृती खाते, क्रीडा व आदिवासी कल्याण खाते दिले आहे. तर दिगंबर कामत यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली असून त्यांना सार्वजनिक बांधकाम हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे.
दरम्यान, सभापती पदासाठी सध्या आमदार गणेश गावकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचीच निवड होईल, अशी भाजपच्या गोटात चर्चा आहे. सध्या ४० पैकी सत्ताधारी भाजपचे २८ आमदार आहेत. तसेच मगोचे दोन आमदार व तीन अपक्ष आमदारांचाही सरकारला पाठिंबा आहेत. तर विरोधी आमदारांची संख्या सात आहे. दरम्यान, सभापतीपदासाठी अर्ज भरण्याची मुदत २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.