सरकारचे कर्ज ४ हजार कोटींवर
By Admin | Updated: August 25, 2014 00:54 IST2014-08-25T00:52:28+5:302014-08-25T00:54:26+5:30
सरकारने खुल्या बाजारातून उचललेले कर्ज ४ हजार ६३७ कोटी ५२ लाख रुपयांवर पोचले आहे.

सरकारचे कर्ज ४ हजार कोटींवर
पणजी : सरकारने खुल्या बाजारातून उचललेले कर्ज ४ हजार ६३७ कोटी ५२ लाख रुपयांवर पोचले आहे. नजीकच्या काळात आणखी तीनेकशे कोटींचे रोखे काढले जाणार आहेत.
राज्य सरकारच्या डोक्यावर एकूण ९ हजार ३२ कोटी ५६ लाख रुपये कर्ज आहे. आर्थिक कसरती करताना दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्ज उचलावे लागत आहे. आधीच मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारातून अशा प्रकारच्या कर्जाची उचल झालेली असल्याने आगामी काळात देय रक्कम बाहेर काढताना सरकारला ते बरेच महागात पडणार आहे. नजीकच्या काळात लाभांशासह देय असलेल्या रोख्यांवर दीडेक हजार कोटी रुपये सरकारला तिजोरीतून बाहेर काढावे लागतील, अशी माहिती वित्त खात्यातील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सरकारने वेळोवेळी १३.०५ टक्क्यांपर्यंत व्याजाने रोख्यांद्वारे दहा ते पंधरा वर्षांच्या मुदतीसाठी कर्ज घेतलेले आहे.
अधिकृत माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातच १३२ कोटी, २०१५-१६ या वर्षात १६५ कोटी, २०१६-१७ या वर्षात १४८ कोटी, तर २०१७-१८ मध्ये तब्बल ४०० कोटी रुपये सरकारला देय असलेल्या रोख्यांपोटी बाहेर काढावे लागतील.
वित्त खात्यातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंजूर मर्यादेतच हे कर्ज उचलण्यात आलेले आहे. (प्रतिनिधी)