आमच्या जमिनींमध्ये आता सरकारने हस्तक्षेप करू नये; आसगाव येथील बैठकीत इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:51 IST2025-07-17T10:50:53+5:302025-07-17T10:51:12+5:30
'कोमुनिदादचे रक्षण करा' व 'गोवा वाचवा' या बॅनरखाली आसगाव कोमुनिदाद कार्यालयात जनजागृती बैठक पार पडली.

आमच्या जमिनींमध्ये आता सरकारने हस्तक्षेप करू नये; आसगाव येथील बैठकीत इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : कोमुनिदाद जमिनीवर गावकार आणि भागधारकांचाच अधिकार आहे. त्यामुळे सरकारने त्यात हस्तक्षेप करून जमिनीवर बांधण्यात आलेली घरे नियमित करण्याचा प्रयत्न करू नये. याविरोधात प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा आसगाव कोमुनिदादचे अध्यक्ष रुइल्डो डिसोझा यांनी दिला आहे.
'कोमुनिदादचे रक्षण करा' व 'गोवा वाचवा' या बॅनरखाली काल, बुधवारी आसगाव कोमुनिदाद कार्यालयात जनजागृती बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष डिसोझा बोलत होते. त्यानंतर नेरुल येथील कोमुनिदाद संघटनेचीही बैठक झाली. आसगाव येथील बैठकीला उत्तर गोव्यातील कोमुनिदादचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोमुनिदाद जागेतील घरे नियमित करून सरकार गावकार आणि भागधारकांवर अन्याय करू पहात असून हा प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी दिला.
कोमुनिदाद जागेतील बेकायदेशीर घरे नियमित करण्यास सरकारकडून पावले उचलण्यात आल्यास त्याचे विपरीत परिणाम भविष्यात सहन करावे लागतील. बेकायदेशीर बांधकामांना उत्तेजन मिळून अशी बांधकामे फोफावतील आणि गोवेकरांसाठी भविष्यात जमिनी शिल्लक राहणार नाहीत. तसेच कायदेशीर मार्गाने बांधकाम करणाऱ्या गोवेकरांवर अन्याय होईल, असेही सांगण्यात आले. याच मुद्यावरून सर्व समित्या एकत्रित आल्या असून भविष्यातील वाटचालीवर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.