परप्रांतीय रुग्णांकडून गोव्यातील सरकारी इस्पितळांत शुल्क आकारणार ; डिसेंबरपासून कार्यवाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:11 IST2017-10-10T15:10:44+5:302017-10-10T15:11:24+5:30
गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक अशा गोव्याच्या आजुबाजुच्या प्रांतांमधील रुग्णांना मोफत उपचार मिळत होते, पण आता त्यांना शुल्क लागू करावे असे ठरले आहे.

परप्रांतीय रुग्णांकडून गोव्यातील सरकारी इस्पितळांत शुल्क आकारणार ; डिसेंबरपासून कार्यवाही
पणजी : गोव्यातील सरकारी इस्पितळांमध्ये आतापर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक अशा गोव्याच्या आजुबाजुच्या प्रांतांमधील रुग्णांना मोफत उपचार मिळत होते, पण आता त्यांना शुल्क लागू करावे असे ठरले आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी याविषयी माहिती देताना सांगितले की, बांबोली येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात आणि गोव्यातील दोन्ही जिल्हास्तरीय सरकारी इस्पितळांत परप्रांतीय रूग्ण खूप येतात. सिंधुदुर्गपासून कारवारपर्यंतचे रुग्ण येत असतात. यापुढे परप्रांतीय रूग्णांकडून ठराविक शुल्क आकारले जाईल. शुल्काचे प्रमाण सरकारी समिती निश्चित करील. आपण अतिरिक्त आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेण्यासाठी फाईल तयार केली आहे.
मंत्री राणे म्हणाले की गोव्याचे ओळखपत्र किंवा गोव्याची काही तरी ओळख असलेला पुरावा रुग्णांकडे असायला हवा. ज्यांच्याकडे तो नाही अशा रुग्णांना परप्रांतीय ठरवून यापुढे शुल्क आकारले जाईल. येत्या डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. प्रथम तीन मोठ्या सरकारी इस्पितळांत प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर मग अन्य छोटी सरकारी रूग्णालये व आरोग्य केंद्रांमध्येही हा निर्णय लागू केला जाईल.
दरम्यान गोव्यातील गोमेकॉ इस्पितळात बायपास व अन्य हृदयविषयक शस्त्रक्रिया आतापर्यंत मोफत केल्या जात आहेत. त्यासाठी खास तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.