सरकार गतिमान
By Admin | Updated: November 18, 2014 02:07 IST2014-11-18T01:55:58+5:302014-11-18T02:07:33+5:30
मंत्र्यांनी घेतला ताबा : कारभार सुरू; फाईल्स हातावेगळ्या

सरकार गतिमान
पणजी : गेल्या आठवड्यात शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी बहुतेक मंत्र्यांनी आपल्या कामाचा ताबा घेतला. सोमवारपासून पूर्ण मंत्रिमंडळाने कामकाज सुरू केले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या फाईल्स काही मंत्र्यांनी हातावेगळ्या करण्यास प्रारंभ केला.
मगो पक्षाचे मंत्री सुदिन ढवळीकर, दीपक ढवळीकर यांनीही सोमवारी मंत्रालयात येऊन आपल्या पदाचा ताबा घेतला व काम सुरू केले. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो, वनमंत्री अॅलिना साल्ढाणा यांनीही मंत्रालयात येऊन पदाची सूत्रे स्वीकारली. आपल्या कर्मचारी वर्गाशी चर्चा केली. काही प्रलंबित फाईल्सही हातावेगळ्या केल्या.
गेले दहा दिवस प्रशासन काहीसे ठप्प झाले होते. मंत्र्यांकडे खाती नसल्याने फाईल्स फिरत नव्हत्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ आता सक्रिय होऊ लागले आहे. या आठवड्यात मंत्रिमंडळाची पहिली बैठकही होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या मंत्र्यांना वजनदार खाती मिळाल्याने ते खुश आहेत; पण मंत्री दीपक ढवळीकर, आवेर्तान फुर्तादो व मिकी पाशेको समाधानी नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. फुर्तादो यांचे ग्रामीण विकास हे खाते काढले गेले आहे. ते खाते मंत्री पाशेको यांना दिले गेले आहे. पाशेको यांच्याकडे ग्रामीण विकास वगळता अन्य महत्त्वाचे खाते नाही. त्यांनी कधीच हाताळली नाहीत अशा प्रकारची खाती त्यांना दिली आहेत. दीपक ढवळीकर यांच्याकडील सहकार खाते मिळाल्याने उद्योगमंत्री महादेव नाईक हे खुश आहेत; पण ढवळीकर नाराज आहेत. मुख्यमंत्रिपदी असताना मनोहर पर्रीकर हे स्वत: खूप सक्रिय असायचे. त्यामुळे अन्य मंत्रीही सक्रिय होण्याचा प्रयत्न करत होते. आता पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रशासन सक्रिय ठेवण्याचे मोठे आव्हान नवे मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यासमोर आहे. मंत्री, आमदारांच्या विदेश दौऱ्यांनाही लगाम घालण्याची कसरत पार्सेकर यांना करावी लागेल.
पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना परिमल रे आणि पवन कुमार सेन हे दोन आयएएस अधिकारी सक्रिय होते. ते पर्रीकर यांच्या खास विश्वासातील मानले जात होते. पर्रीकर संरक्षणमंत्री बनल्याने आता या दोघांचीही दिल्लीत बदली झाली आहे. परिमल रे हे संरक्षण मंत्रालयात काम करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. पर्रीकर मुख्यमंत्री असताना पी. कृष्णमूर्ती हे त्यांचे सचिव होते. आता त्यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. ते दिल्लीला पर्रीकर यांचे सचिव बनतील, असे कळते. (खास प्रतिनिधी)