नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार सक्षम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:56 IST2025-07-15T09:55:44+5:302025-07-15T09:56:26+5:30

मेणकुरे येथे दहा एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी, गोवा राज्य पाण्याबाबत स्वयंपूर्ण

government capable of providing regular water supply said cm pramod sawant | नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार सक्षम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार सक्षम: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: गेल्या सहा वर्षात राज्य सरकारने पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना चालना दिली असून, अनेक कामे सुरू आहेत. राज्यभर नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी सरकार सक्षम बनले असून, पाण्याबाबत राज्य स्वयंपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मेणकुरे येथे साकारण्यात येणाऱ्या दहा एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पायाभरणीचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये तसेच प्रदीप रेवडकर, सुभाष बेळगावकर, उमेश शेट्ये, कुमुदिनी नाईक, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य, अधिकारी वर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

हा जलशुद्धीकरण प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्य अभियंता सुभाष बेळगावकर यांनी स्वागत केले.

साळ, मेणकुरे भागातील पडीक शेत जमीन लागवडीखाली आणण्यासाठी सहकार्य करणार. साळ येथील नवीन बेरेज प्रकल्प, जलसिंचय करणारे टाकी व जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे डिचोली मतदारसंघात पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे. आगामी २५ वर्षाचे नियोजन करून आम्ही वेगवेगळ्या योजना आखत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. हा पाणी प्रकल्प आधुनिक तंत्राच्या यंत्रणेवर आधारित आहे.

शेतकरी, स्वयंसहाय्य गटांना राष्ट्रीय बाजारपेठ

लाटंबार्से औद्योगिक वसाहतीत फक्त फूड प्रोसेसिंग युनिटना चालना देण्यात येणार असून, इतर युनिट या ठिकाणी स्वीकारण्यात येणार नाही. अन्नप्रक्रिया प्रकल्पांनाच विशेष चालना या ठिकाणी देण्यात येईल. येथून मोपा विमानतळ जवळ असल्याने त्या दृष्टीने आमचा विचार हा अन्न प्रक्रिया प्रकल्पांना पूरक आहे. या भागातील शेतकरी स्वयंसेवक गटांनी आपले साहित्य उत्तम प्रकारे तयार करून त्याला राष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री राजकीय गुरू : चंद्रकांत शेट्ये

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मुख्यमंत्री हे सातत्याने जनतेच्या विकासासाठी काम करतात. ते माझे खरे राजकीय गुरु असून, त्यांनी मला भरभरून सहकार्य दिलेले आहे. मुख्यमंत्री हे सतत एनर्जेटिक बनवून ते सदैव जनसेवेचा वसा घेत कार्यरत असतात. त्यामुळेच गेल्या सहा वर्षात गोव्याचा विकास झपाट्याने झाला असून, डिचोली मतदारसंघाला प्रत्येक योजनेत सहकार्य दिलेले आहे, असे डॉ. शेट्ये म्हणाले.

कोरड्या पाट्या लावत नाही

शेवटच्या घटकापर्यंत विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नारा यशस्वी करण्यात सरकार मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत असून, आम्ही अनेक प्रकल्प सुरू करतो, ते पूर्णत्वास नेण्यासाठी केवळ कोरड्या पाट्या आम्ही लावत नाही. त्यामुळे सर्व घटक आणि विकासाच्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना केले.
 

Web Title: government capable of providing regular water supply said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.