खुशखबर... एकाच घरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांना आता स्वतंत्र घरक्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:14 IST2025-07-29T13:14:21+5:302025-07-29T13:14:53+5:30
परिपत्रक जारी : घर दुरुस्तीसाठीही फास्ट ट्रॅक

खुशखबर... एकाच घरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांना आता स्वतंत्र घरक्रमांक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पालिका क्षेत्रात एकाच घरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांना आता स्वतंत्र घरक्रमांक मिळणार आहे. वीज, पाणी जोडणीही स्वतंत्र मिळणार आहे. घरदुरुस्तीसाठीही फास्ट ट्रॅक सोय केली आहे. याबाबत दोन परिपत्रके काल जारी करण्यात आली असून पालिका क्षेत्रातील सामायिक घरांमधील कुटुंबांसाठी नागरिक अनुकूल सुधारणा सरकारने जाहीर केलेल्या आहेत.
कुटुंबांना आता विद्यमान घरांच्या भागांसाठी स्वतंत्र घरक्रमांक मिळू शकतो, ज्यामुळे स्वतंत्र पाणी आणि वीज कनेक्शन मिळू शकेल. कोणत्याही गुंतागुंतीच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांची आवश्यकता नाही. १५ दिवसांत अर्ज मंजूर केले जातील. सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया असेल. विकसित गोवाच्या दिशेने एक पाऊल, प्रत्येक गोवेकरांसाठी प्रतिष्ठा, सहजता आणि स्वावलंबन निश्चित करणे हा हेतू आहे. पालिका क्षेत्रातील घरांच्या दुरुस्तीच्या कामांसाठीही प्रक्रिया सोपी केली आहे. ५ वर्षांहून अधिक काळ घरकर भरलेल्या घरांना हे लागू आहे. तीन दिवसांत अर्ज मंजूर केले जातील. स्केच, छायाचित्रे आणि आर्किटेक्टचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, पालिका व महापालिकेने अशा अर्जावर १५ दिवसांच्या आत प्रक्रिया करावी आणि पाणी आणि वीजजोडणीसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी करावे, असे परिपत्रक म्हणते. विभाजित क्रमांकात 'अ', 'ब' इत्यादी प्रत्यय समाविष्ट असतील. दुभाजक भागात स्वतंत्र स्वयंपाकघर असणे आवश्यक आहे आणि ते निहामान नितासस्थानाच्या शेजारील भागात असणे आवश्यक आहे. पालिका मुख्याधिकारी, मनपा आयुक्तांना अर्जात दिलेल्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी जागेची योग्य तपासणी करण्याचे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे बेकायदेशीर बांधकामांना लागू होत नाटीत असे म्हटले आहे.
गुंतागुंत संपली
भूखंडाचे विभाजन किंवा गुंतागुंतीच्या औपचारिकता न करता विभक्त कुटुंबांना घरक्रमांकांचे विभाजन करण्याची प्रक्रिया आता सोपी व सुटसुटीत झाली आहे. पालिका क्षेत्रात घरक्रमांक असलेल्या प्रत्येकाला ती लागू होते. कुटुंबांना एकाच घरात अ, ब, आणि क सारखे स्वतंत्र पोट घरक्रमांक मिळतील. एनओसींद्वारे स्वतंत्र पाणी आणि वीज कनेक्शन घेणे शक्य होईल.
विभाजनासाठी पात्रता
स्वतंत्र अस्तित्व म्हणून राहण्याची आणि स्वतंत्रपणे घर कर भरण्याची इच्छा असलेले स्वतंत्र घरक्रमांकासाठी अर्ज करू शकतात. विभाजन पूर्णपणे आर्थिक आणि सुविधांशी संबंधित उद्देशांसाठी आहे आणि मालकीहक्क प्रदान करत नाही.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. मूळ निवासस्थानाची नवीनतम भरलेली घरकर पावती., मूळ करदात्याचा मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास), नातेसंबंधाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड इ.., भोगवटा असलेल्या भागाचे स्केच/सर्वेक्षण., विहित फॉर्म आणि तपशील खरे असल्याचे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र.)