मडगावला लवकरच 'अच्छे दिन': मुख्यमंत्री प्रमोद सांवत; कार्यकर्त्यांशी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:44 IST2025-04-16T13:42:39+5:302025-04-16T13:44:01+5:30
मडगाव येथील दैवज्ञ भवन सभागृहात मंगळवारी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मडगावला लवकरच 'अच्छे दिन': मुख्यमंत्री प्रमोद सांवत; कार्यकर्त्यांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : पणजी शहराप्रमाणे मडगाव शहराचा विकास भाजप सरकार करणार आहे. मडगावात ट्रीपल इंजिन सरकार असल्यामुळे मडगावच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. आता मडगावकरांना लवकरच 'अच्छे दिन' येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
मडगाव येथील दैवज्ञ भवन सभागृहात मंगळवारी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मडगाव भाजप मंडळ अध्यक्ष अभिषेक काकोडकर, द. गो. भाजपचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, द. गो. जिल्हा प्रभारी सर्वानंद भगत, सरचिटणीस शर्मद रायतूरकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष बबिता नाईक, योगीराज कामत, गोपाळ नाईक व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
भाजपामध्ये सर्व धर्माचे लोक मोठ्या उत्साहात पक्षासाठी काम करत आहेत. मडगावचे आमदार हे मूळ भाजपाचे, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले व पुन्हा भाजपमध्ये आले. कारण, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व माहीत आहे. भाजपच गोव्याचा विकास करू शकते, हे त्यांना पटले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी संघटित राहून २०२७ मध्ये २७ हून अधिक जागा निवडून आणायला हव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मडगावातील वारसा इमारतींचा विकास भाजपचे सरकार करणार आहे.
मडगावात बुलबुल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, त्याला पालक व मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा एकदा मडगावातच हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्यांची घरे कायदेशीर व्हायला हवी ती केली जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आमदार कामत यांनी पुढील दोन वर्षात जे व्हिजन समोर ठेवून मडगावच्या विकासाची स्वप्ने पाहिली आहेत ती पूर्ण झालेली दिसून येतील. सोनसडो कचरा प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मडगावातील वारसा इमारतींचा विकास भाजपचे सरकार करणार आहे. मडगावात बुलबुल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, त्याला पालक व मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा एकदा मडगावातच हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
मतभेद न ठेवता काम करा : दामू नाईक
प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, राज्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी करावी. कोणतेही मतभेद न ठेवता पक्षासाठी संघटित होऊन काम करावे. यावेळी मडगावकरांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विरोधकांनी डोळ्यावर पट्टी बांधली
यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच यापुढेही मडगावकरांनी अशीच साथ देण्याचे आवाहनही केले. त्याचवेळी कामत यांनी विरोधक डोळ्यावर पट्टी बांधून फिरत असल्यामुळे त्यांना आपली कामे दिसत नसल्याची टीका केली.