नव्या वर्षात सोने ९५ हजारांपर्यंत जाणार! व्यापाऱ्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2024 09:09 IST2024-12-29T09:08:24+5:302024-12-29T09:09:09+5:30
१० ग्रॅम सोन्याचा दर ७९ हजार ८०० रुपये

नव्या वर्षात सोने ९५ हजारांपर्यंत जाणार! व्यापाऱ्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सोन्या-चांदीच्या किमतींत कितीही वाढ झाली तरी हौशी ग्राहकांचा खरेदीसाठी ओढा कायम असतो. गेल्या काही वर्षांत सोन्या चांदीच्या दरात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७९ हजार ८०० रुपये आहे. मात्र, नववर्षात हा दर ९५ हजारांपर्यंत जाईल, अशी शक्यता सोन्याचे व्यापारी व्यक्त करत आहेत.
राज्यात लग्नसराई सुरू असल्याने सोने महाग असूनही खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत आहेत. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७९ हजार ८०० रुपये इतका झाला आहे. सध्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने लोक कमी वजनाच्या व डिझायनर दागिन्यांना अधिक पसंती देत आहेत. गुंतवणूक म्हणूनही लोक सोने खरेदी करीत आहेत.
गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर म्हणाले, नव्या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दर ८५ हजारांपर्यंत जाऊ शकतो. सोन्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात करात कपात केली होती. त्यानंतर दर काहीसे कमी झाले होते. त्यामुळे २०२५ या वर्षाच्या अखेरपर्यंत हे दर ९५ हजारांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. मात्र, ते १ लाखापर्यंत जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले.
गुंतवणुकीला प्राधान्य
सोन्याचे दर वाढले असले तरी लग्नसराई तसेच गुंतवणूक म्हणूनही लोक ते खरेदी करीत आहेत. सोन्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनही पाहत आहेत. कारण त्याच्या दरात सतत वाढ होत आहे. दागिन्यांप्रमाणेच सोन्याची नाणी व बिस्किटे खरेदी करण्यास लोक अधिक पसंती देत असल्याचे कुडतरकर यांनी सांगितले.
'लॅब ग्रोन डायमंड'ला पसंती वाढतेय
अनेकांना सोन्यापेक्षा डायमंडच्या दागिन्यांची भलतीच भुरळ आहे. मात्र, सोन्यापेक्षाही डायमंड महाग आहेत. नैसर्गिक डायमंड प्रमाणे सध्या लॅब ग्रोन डायमंड अर्थात प्रयोगशाळेत तयार केलेले डायमंडही उपलब्ध असून ते अस्सल डायमंड प्रमाणेच असतात. नैसर्गिक डायमंडच्या प्रतिकॅरेटचा दर ८० हजार रुपये, तर लॅब ग्रोन डायमंडचा प्रतिकॅरेट दर ३५ हजार रुपये इतका आहे.