गोव्यातील कॅसिनो म्हणजे पर्रीकर सरकारचे एटीएम, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 19:09 IST2017-10-10T19:08:55+5:302017-10-10T19:09:03+5:30
गोव्यातील मांडवी नदीतील कॅसिनो म्हणजे पर्रीकर सरकारसाठी एटीएम आहे, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे केली.

गोव्यातील कॅसिनो म्हणजे पर्रीकर सरकारचे एटीएम, काँग्रेसची टीका
पणजी : गोव्यातील मांडवी नदीतील कॅसिनो म्हणजे पर्रीकर सरकारसाठी एटीएम आहे, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांनी मंगळवारी येथे केली.
गेल्या साडेपाच वर्षांत सरकारने अकरावेळा कॅसिनो जहाजांना मांडवीत राहण्यासाठी मुदतवाढ दिली. दरवेळी सरकार कॅसिनोना मांडवीबाहेर पाठवणार असे जाहीर करते आणि मग गुपचूप मुदतवाढ देते. गोमंतकीयांना फसवण्याची ही नाटके सरकारने बंद करावी असे चोडणकर येथे पत्रकार परिषदेत म्हणाले.
सरकार कॅसिनोंकडून पैसे घेते आणि मुदतवाढ देते. कॅसिनो जुगार गोव्यातून हद्दपार करा अशी आमची मागणी आहे. कारण कॅसिनो गोमंतकीयांना उध्वस्त करत आहे, असे चोडणकर म्हणाले. कॅसिनोंमध्ये रोज लाखो रुपयांची रोख रक्कम वापरून उलाढाल केली जाते. प्राप्तीकर कायदे सामान्य माणसाची अडचण करण्यासाठी बदलणार्या केंद्र सरकारने या उलाढालीकडे लक्ष द्यावे असे चोडणकर म्हणाले.
मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे करमणूक झोन तयार करून सरकार कॅसिनो जुगारास मोपा येथे नेऊ पाहत आहे. सरकारने मोपा परिसरातील लोकांशी त्याविषयी चर्चा केली आहे काय अशी विचारणा चोडणकर यांनी केली.