पर्यटकांचा जीव गुदमरतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 12:38 PM2023-05-02T12:38:05+5:302023-05-02T12:38:26+5:30

जगात गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शेजारील सिंधुदुर्ग आणि कारवार हे जिल्हेही पर्यटकांसाठी एरव्ही पर्वणी ठरतात.

goa tourism issues increased and its impact | पर्यटकांचा जीव गुदमरतोय

पर्यटकांचा जीव गुदमरतोय

googlenewsNext

जगात गोवापर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शेजारील सिंधुदुर्ग आणि कारवार हे जिल्हेही पर्यटकांसाठी एरव्ही पर्वणी ठरतात. दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आदी भागांतून लाखो पर्यटक दरवर्षी गोव्यात येऊन जातात; मात्र अलीकडील काही घटना चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत. गोव्यात पर्यटकांना विविध कारणास्तव असुरक्षित वाटते. काहीवेळा पर्यटकांच्या चुकीमुळेच पर्यटकांचा जीव जातो, तर काही पातळीवरील गुन्हेगार पर्यटकांचा जीव घेतात. गोव्याच्या सीमेवर महाराष्ट्रातील आंबोलीला हजारो पर्यटकांची गर्दी असते. तिथेही काही पर्यटक मद्यपान करून मस्ती करतात. हाच अनुभव गोवा- कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाट परिसरात येतो. पर्यटकांना आपला छळ होतोय, आपण लुटले जातोय असे वाटू नये म्हणून उपाययोजनांची गरज आहे. 

गोव्यात मोपा है। आंतरराष्ट्रीय विमानतळ याचवर्षी साकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले गेले. चिमुकल्या गोव्यातील हे दुसरे विमानतळ आहे. या विमानतळाचा लाभ महाराष्ट्रालाही होत आहे. गोव्याला वार्षिक सरासरी ८० लाख पर्यटक भेट देतात, नवे विमानतळ, सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाच्या सोयीमुळे यापुढे एक कोटीहून अधिक पर्यटक गोव्याला भेट देऊ लागतील. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते की, एक कोटीहून अधिक पर्यटकांनी दरवर्षी गोव्याला भेट द्यायला हवी. जुवारी नदीवर नवा केबल स्टेड पूल साकारला. यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली; मात्र पर्यटकांची जेवढी गर्दी वाढेल, तेवढे स्थानिक विरुद्ध पर्यटक असे तंही वाढण्याची चिन्हे दिसतात. समुद्रकिनाऱ्यावर चारचाकी वाहन नेता येत नाही; पण काही पर्यटक मुद्दाम आलिशान गाड्या किनाऱ्यावर नेतात. तसे फोटो अलीकडे व्हायरल झाले आहेत. अशा पर्यटकांविरुद्ध गोवा पोलिसांनी गुन्हेही नोंदवले. 

गोव्यातील काही टॅक्सी व्यावसायिकांकडून लूट केली जाते ही महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक देशी पर्यटकांची तक्रार आहे. विदेशी पर्यटकांनीही यापूर्वी तक्रार करून व्हिडीओही व्हायरल केले आहेत. अर्थात सर्वच टॅक्सी व्यावसायिक पर्यटकांकडून जास्त भाडे आकारत नाहीत; पण काही जणांकडून जास्त पैसे उकळले जातात ही वस्तुस्थिती आहे. काही टॅक्सी व्यावसायिकांबाबत विदेशी पर्यटकांना कटू अनुभव आल्याने पुन्हा गोव्याला जाणार नाही, असे सांगणारेही भेटतात. गोव्याच्या पर्यटन व्यवसायासाठी ही धोक्याची घंटा आहे. अति लोभामुळे ज्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी गोव्याचा खाण धंदा बंद झाला, त्याच पद्धतीने पर्यटनाशी निगडित अन्य काही धंद्यांवर गदा येऊ शकते. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच मारण्याचे पाप काही व्यावसायिकांच्या माथी येऊ शकते. अलीकडेच गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी अचानक उत्तर गोव्याच्या किनारी भागाला भेट दिली. त्यावेळी ज्या जलक्रिडेसाठी एरव्ही आठशे रुपये खर्च येतो, त्यासाठी तीन हजार आकारले जात असल्याचे आढळून आले. 

पर्यटकांची लूट थांबविण्यासाठी मग पर्यटन खात्याने कडक पावले उचलणे सुरू केले. गोव्यात पर्यटकांना सुरक्षित वाटायला हवे, आपली लूट होतेय असे वाटू नये म्हणून खंवटे यांनीही काही निर्णय घेतले आहेत; मात्र दुर्दैव असे की, गोव्याच्या किनारी भागांतील काही आमदारांना कडक उपाययोजना मान्य नाही. पर्यटन खाते कडक वागू लागले की, काही आमदार थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना साकडे घालतात. यामुळे पर्यटन व्यवसायात सुधारणा होत नाहीत. सध्या प्रचंड उकाड्याचे दिवस आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, केरळ व अन्य भागांतील लाखो देशी पर्यटकांनी गोव्यात गर्दी केलेली आहे. सायंकाळी समुद्रस्नानाचा आनंद लुटला जातो; मात्र पर्यटक बुडून मरण्याच्या घटना पूर्णपणे थांबलेल्याही नाहीत. 

काही पर्यटक दुपारीही मद्यपान करून समुद्रात उतरतात. पाण्यात उतरू नये असे फलक लावलेले असतात, तिथेही धोका पत्करला जातो. अलीकडे काही पर्यटकांच्या बॅगा व किमती वस्तू हॉटेलच्या खोल्यांमधून पळविण्याचेही एक-दोन प्रकार घडले आहेत. यातूनही गोव्याचे पर्यटन बदनाम होतेय, हे नमूद करावे लागेल. गोव्यात ड्रग्जचे अतिसेवन करूनही काही पर्यटक जीव गमावतात, हे चिंताजनक आहे. टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिचा गोव्यातील मृत्यू पूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला होता. ड्रग्ज धंद्याची पाळेमुळे खणून काढणे हे गोवा पोलिसांसमोर अजून देखील आव्हान आहेच.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: goa tourism issues increased and its impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.