राज्य संकटात, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल १३ टक्क्यांनी वाढले: विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 07:54 IST2025-03-25T07:47:19+5:302025-03-25T07:54:46+5:30

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत हल्लाबोल

goa state in crisis the rate of serious crimes has increased by a whopping 13 percent said vijay sardesai | राज्य संकटात, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल १३ टक्क्यांनी वाढले: विजय सरदेसाई

राज्य संकटात, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल १३ टक्क्यांनी वाढले: विजय सरदेसाई

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले तर उत्तर गोव्यात घरफोड्या व चोऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले, असा दावा करीत विरोधी आमदार विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी बोलताना सरदेसाई यांनी सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याची घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, आकडेवारी पाहिल्यास २०२३ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२४ मध्ये राज्यात गंभीर गुन्हे १३ टक्क्याने वाढले. पोलिस केश कर्तनालयांमध्ये न्हाव्यांकडूनही खंडणी उकळत आहेत.

या सरकारने गोवा विकायला काढला आहे, अशी टीका करत सरदेसाई यांनी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम भाडेपट्टीवर देण्यास जोरदार विरोध केला. ते म्हणाले की, जनसंघाच्या संस्थापकाचे नाव दिलेला हा स्टेडियम सरकार लाटू पाहत आहे. हे सरकार गोवा विकायलाही मागे पुढे पाहणार नाही.

दिल्लीतील धनाढ्य लोक गोव्यात जमिनी खरेदी करता एवढेच माहित होते. परंतु आता दिल्लीतील पर्यटक गोव्यात येऊन स्थानिकांना मारहाणही करू लागले आहेत ही मोठी शोकांतिका आहे.

सरकारच्या आर्थिक स्थितीवर टीका करताना सरदेसाई म्हणाले की, कर्ज काढून सण साजरे करण्याचा प्रकार चालला आहे. सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गातून लोकांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. साऊंड सिस्टमसाठी परवानगी घेताना आता वेगवेगळे शुल्क लागू केले आहे. ही अधिकृत खंडणीच आहे.'

काँग्रेस आमदार कार्ल्स फेरेरा यांनी महिला तसेच वृद्धांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचे पैसे दोन ते तीन महिने मिळतच नाहीत. थेट बँकेत पैसे जमा करण्याची योजना फसली आहे, अशी टीका केली. ते म्हणाले की, 'सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

उत्तर प्रदेश होऊन आरोपी पकडून आणताना तो मुंबईत पोलिसांच्या हातून निसटतो व असे असूनही संबंधित पोलिसांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. गिरी येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे घबाड पकडले जाते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स आले कुठून याचा शोध पोलिस घेत नाहीत. मार्केटिंग फेडरेशनमध्ये व्यवस्थापकीय संचालकांकडून २९ लाखांचा घोटाळा केला जातो. पण त्याच्यावर कारवाई केली जात नाही. पर्यटक गोव्यात येतात आणि स्थानिकांना मारहाण करतात. परंतु कोणतीच कारवाई होत नाही. सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे.'

बिहारदिन कसला साजरा करताय?

गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व जपले, तो सार्वमतदिन साजरा करण्याचे टाळले जाते व बिहारदिन मात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, अशी टीकाही सरदेसाई यांनी सरकारवर केली. ते म्हणाले की, आसामामध्ये बिहारदिन साजरा करण्याचे बंद केले आहे. सावंत सरकार ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांचे दिन आता साजरे करायला निघाले आहे, हे गोवेकरांचे दुर्दैव होय.

गुन्हेगारीवर वचक हवाच

राज्यात वाढत्या गुन्हेगारीचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त तसेच पर्यटनासाठी परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच नाही. त्यामुळे गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनत असून यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा, असेही सरदेसाई म्हणाले.

Web Title: goa state in crisis the rate of serious crimes has increased by a whopping 13 percent said vijay sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.