इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 10:24 IST2025-12-08T10:23:17+5:302025-12-08T10:24:22+5:30
Goa Nightclub Fire News: प्राथमिक तपासात, ही आग सिलेंडर स्फोटामुळे नव्हे, तर इलेक्ट्रिक फटाक्यांच्या ठिणगीतून लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री ११:४५ च्या सुमारास ही ठिणगी क्लबच्या लाकडी सीलिंगवर पडली आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले.

इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल!
गोव्यातील अरपोरा परिसरात असलेल्या 'बिर्च बॉय रोमियो लेन' नाईट क्लबमध्ये शनिवारच्या रात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या अग्निकांडात २५ लोकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतांश लोकांचा बळी धुरामुळे गुदमरून गेला आहे. या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर गोवा सरकारने कठोर कारवाई सुरू केली आहे.
प्राथमिक तपासात, ही आग सिलेंडर स्फोटामुळे नव्हे, तर इलेक्ट्रिक फटाक्यांच्या ठिणगीतून लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री ११:४५ च्या सुमारास ही ठिणगी क्लबच्या लाकडी सीलिंगवर पडली आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणांत आगीने रौद्र रूप धारण केले.
या दुर्घटनेतील मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे क्लबमधील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव हे आहे. क्लबमध्ये येण्या-जाण्यासाठी केवळ एकच मार्ग होता, जो आगीमुळे पूर्णपणे बंद झाला. जीव वाचवण्यासाठी तळघरात धावलेल्या २३ कर्मचाऱ्यांचा व पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला. तळघरात हवा खेळती ठेवण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आग विझल्यानंतर तळघरात मृतदेह एकावर एक पडलेले आढळले, हे दृश्य मन सुन्न करणारे होते. संकरीत रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही ४०० मीटर दूर थांबावे लागले, ज्यामुळे वेळेवर मदत पोहोचू शकली नाही.
मालकांवर एफआयआर, ४ कर्मचारी अटकेत: घटनेची गंभीर दखल घेत गोवा पोलिसांनी नाईट क्लबचे मालक सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून अटक वॉरंट जारी केले आहे. त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे विशेष पथक दिल्लीकडे रवाना झाले आहे. यासह, क्लबच्या चार कर्मचाऱ्यांना (जनरल मॅनेजर, गेट मॅनेजर, बार मॅनेजर) तातडीने अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
पंतप्रधानांकडून नुकसान भरपाई: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.