गोवा एनसीबी प्रमुखाची २६ लाखांची बेहिशेबी मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:21 IST2018-09-29T22:20:16+5:302018-09-29T22:21:28+5:30
सीबीआयच्या छाप्यानंतर गुन्हा नोंद

गोवा एनसीबी प्रमुखाची २६ लाखांची बेहिशेबी मालमत्ता
पणजी: राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) गोव्यातील प्रमुख जितेंद्र राजन यांच्याविरुद्ध सीबीआयकडून बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पर्वरी येथील निवासस्थानावर सीबीआयच्या पथकाने छापा टाकल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्याकडे २६.१० लाखांची बेहीशेबी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.
त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती ८.५७ लाख रुपयांवरून चार वर्षांत राजन कुटुंबियांची संपत्ती ४०.२४ लाखांवर गेल्याचे कागदपत्रांच्या छाननीनंतर आढळून आले आहे. अधिकृत उत्पन्न त्यातून वगळल्यास २६.१० लाख रुपयांच्या मालमत्तेचा हिशेब लागत नसल्याचे सीबीआयने नोंदविलेल्या गुन्यात म्हटले आहे. अधिकृत उत्पन्नापेक्षा ६३ टक्के अधिक मालमत्ता त्याने मिळविली आहे.
सीबीआयच्या सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. राजन याने आपल्या पदाचा गैरवापर करून ही मालमत्ता जमविल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. त्यांचे बँकेचे पासबुक आणि इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. राजन त्यांची एक पत्नी व दोन मुली असे कुटुंब असून कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बँक खात्यातील व्यवहार तेच पाहत होते असेही सीबीआयने म्हटले आहे.