विश्वजीत राणेंनी साधला पंतप्रधानांशी दिलखुलास संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 12:51 IST2024-12-20T12:51:05+5:302024-12-20T12:51:37+5:30
मंत्री राणे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी नंतर राजकीय स्वरूपाची चर्चा झाली.

विश्वजीत राणेंनी साधला पंतप्रधानांशी दिलखुलास संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल, गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, गोव्यात विविध प्रकारच्या राजकीय चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी पंतप्रधान भेटीचे टायमिंग साधले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्री राणे यांनी पंतप्रधानांकडे आपले 'दिल खुले' केले. विश्वजीत राणे यांचे वडील प्रतापसिंह राणे आणि आई विजयादेवी राणे यांनी मोदी यांची एक मोठी प्रतिमा तयार करून घेतली आहे. विश्वजीत यांनी ती प्रतिमा पंतप्रधान मोदी यांना प्रदान केली. पद्मश्री परेश मैती यांनी ही प्रतिमा तयार केलेली आहे.
मंत्री राणे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी नंतर राजकीय स्वरूपाची चर्चा झाली. गोव्यातील राजकीय स्थिती, गोव्यात होणारे विविध वाद, गोव्यातील सध्याची समीकरणे, विरोधी पक्षांची स्थिती याबाबतही चर्चा झाल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. गोव्यात जानेवारीत मंत्रिमंडळ फेररचना होणार आहेच.
मंत्री राणे यांना 'लोकमत'ने याविषयी विचारले असता त्यांनी चर्चेबाबत बोलण्यास नकार दिला. आपले वडील प्रतापसिंह राणे यांनी व आपल्या आईने मोदी यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. आपण त्याच भावना पंतप्रधानांना कळविल्या. विविध राज्यांतील निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला यश मिळाले, यापुढेही असेच यश मिळत राहो आणि पंतप्रधानांना चांगले आरोग्य लाभो, अशी आमच्या कुटुंबाची प्रार्थना असल्याचे आपण पंतप्रधानांना सांगितले. मोदींशी भेट झाल्याने आपल्यालाही खूप समाधान वाटले, असे राणे म्हणाले.
दरम्यान, मोदींशी झालेल्या भेटीनंतर मंत्री विश्वजीत यांनी द्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. विश्वजीत यांनी त्यात म्हटले की, 'एक विनम्र भाजप कार्यकर्ता म्हणून मला मोदी यांची परिवर्तनवादी दृष्टी व देशासाठी अथक समर्पण यातून नेहमीच मला प्रेरणा मिळाली आहे. मोदींशी वैयक्तिक संवादामुळे पक्षासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत करण्याचा संकल्प आणखी दृढ झाला आहे.'
बी. एल. संतोष यांच्याशीही चर्चा
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस थी. एल. संतोष यांना गोव्यातील राजकीय स्थितीची पूर्ण कल्पना आहे. सत्तरी तालुक्यात भाजपने पन्नास हजार सदस्य नोंदणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी संतोष यांची भेट घेतली. आपली ती व्यक्तिगत भेट होती, आपण त्या विषयी काही माहिती उघड करू शकत नाही, असे मंत्री विश्वजीत यांनी 'लोकमत'ला सांगितले.
विश्वजीत राणे म्हणाले की, मोदींना भेटण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. त्यांचा प्रेमळपणा आणि लोकांशी असलेला संबंध प्रत्यक्षपणे पाहिल्याने त्यांच्या नेतृत्वाबद्दल मला जे काही आवडते ते आणखी मजबूत झाले. त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव माझ्या मनात खोलवर रुजलेला आहे. नेशन फर्स्ट आणि 'विकसित भारत'मुळे केवळ धोरणेच बदलली नाहीत, तर माझ्यासारख्या लाखो भारतीयांमध्ये अभिमानाची आणि ध्येयाची नवीन भावना निर्माण झाली आहे. - विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री