'Goa Miles' taxi app now also services on interstate routes; | ‘गोवा माइल्स’ टॅक्सी अ‍ॅपची आता आंतरराज्य मार्गांवरही सेवा

‘गोवा माइल्स’ टॅक्सी अ‍ॅपची आता आंतरराज्य मार्गांवरही सेवा

पणजी : पर्यटकांना दिलासा ठरलेल्या ‘गोवा माइल्स’ टॅक्सी अ‍ॅपने उभारी घेतली असून आणखी ३५0 टॅक्सी या अ‍ॅप सेवेत रुजू झाल्या आहेत. येत्या २0 दिवसात आंतरराज्य मार्गांवरही या अ‍ॅपव्दारे टॅक्सी सेवा उपलब्ध होणार आहे. ‘गोवा माइल्स’चे मुख्य अधिकारी पराशर पै खोत यानी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘गोवा माइल्सच्या ताफ्यात आता एकूण टॅक्सींची संख्या १७८९ झाली आहे. टुरिस्ट टॅक्सीचालकांनी या अ‍ॅपला विरोध करुन संप पुकारला त्यानंतरच्या काळात ५00 टॅक्सीमालकांनी या अ‍ॅप सेवेत रुजू होण्यासाठी अर्ज केले पैकी १५३ अर्ज चालकांकडे पोलीस क्लीअरन्स नसल्याच्या तसेच परमिट कालावधी किंवा विमा मुदत संपल्याच्या कारणास्तव फेटाळण्यात आले.

खोत म्हणाले की, ‘अ‍ॅप सेवेत रुजू झालेल्या टॅक्सींपैकी ५५ टक्के टॅक्सी दक्षिण गोव्यात तर ४५ टक्के टॅक्सी उत्तर गोव्यात आहेत. गोवा माइल्सची सेवा केवळ राज्यांतर्गत उपलब्ध होती. पुढील २0 दिवसात आंतरराज्य मार्गांवरही या अ‍ॅप सेवेचा लाभ घेता येईल. खोत यांनी अशी माहिती दिली की, कर्नाटकमध्ये तीन महिन्याचे परमिट एकदम घ्यावे लागत होते व त्यासाठी ४५ हजार रुपये बाहेर काढावे लागत होते. अलीकडेच तेथील आरटीओने नियम बदलला असून आता एक महिन्याचे परमिटही दिले जात आहे. त्यामुळे शेजारी राज्यांमध्येही लवकरच अ‍ॅप सेवेतील टॅक्सीने प्रवास करता येईल.’

दरम्यान, औद्योगिक वसाहती तसेच सरकारी अथवा खाजगी कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्यांना शेअर तत्त्वावर अ‍ॅप आधारित सेवा उपलब्ध केली जाईल. वेर्णा औद्योगिक वसाहतीत ही सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. टॅक्सीचालकाना ‘होम बटन’ची सुविधा उपलब्ध केली असून त्यांना एखाद्या ठिकाणहून घरी परतताना गिऱ्हाईक मिळवायचे असेल तर हे बटन दाबल्यास तो ज्या भागात जात आहे त्या भागात जाणारा प्रवासी त्याला मिळू शकेल, असे खोत म्हणाले. 

Web Title: 'Goa Miles' taxi app now also services on interstate routes;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.