काजुला आधारभूत देणारे गोवा एकमेव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 08:01 IST2025-05-18T08:00:13+5:302025-05-18T08:01:16+5:30

काजू महोत्सवाचे उद्घाटन; उत्पादन विस्तारासाठी 'कॅशू फॉर नेक्स्ट जनरेशन' संकल्प

goa is the only state that give msp to cashews said cm pramod sawant | काजुला आधारभूत देणारे गोवा एकमेव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

काजुला आधारभूत देणारे गोवा एकमेव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काजू उत्पादनाला आधारभूत किंमत देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. आता कृषी कार्ड नसलेल्या काजू उत्पादकांनाही आधारभूत किंमत दिली जाणार आहे. जेणेकरून काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे सांगितले. वन विकास महामंडळातर्फे येथे आयोजित काजू महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे, वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार डॉ. दिव्या राणे, आमदार गणेश गावकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, प्रधान मुख्यवनपाल कमल दत्ता, एफडीएचे व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार परब आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, काजुला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम वनविकास महामंडळाने केले आहे. जगात आफ्रिकेनंतर भारत देश काजू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता पुढील पिढीकडून काजू उत्पादन वाढविण्यासाठी 'कॅशू फॉर नेक्स्ट जनरेशन' संकल्प आहे.

यावेळी वनविकास महामंडळाच्या सिल्चन या काजू बँडचे उ‌द्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सासष्टी मतदारसंघात सर्व पंचायतींना काजू उत्पादन वाढविण्यासाठी प्रत्येक १ हजार काजू कलमे देण्यात आली. सासष्टी तालुक्यात काजू उत्पादन होत नव्हते, ते आता वाढविले जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांना अनभुवता आले. 'भीट ब्रोज' संगीत कार्यक्रमाचा रसिकांनी आनंद लुटला. 'डबल आर' टीमचे सादरीकरण जबरदस्त झाले. रबिन अँड एलिसन यांच्या गायनाने उद्घाटन समारंभात ऊर्जा आणली. कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती.

काजू विषयावर शिबिर

महोत्सवातून लोकांना काजूविषयी काजूविषया तांत्रिक, भौगोलिक माहिती मिळावी यासाठी विविध शिबिरे आयोजित केली होती. त्यात तज्ज्ञांकडून काजूविषयी माहिती देण्यात आली. राज्यातील काजू उत्पादन, राष्ट्रीय पातळीवरील काजू उत्पादन देशपातळीवर काजूचे संशोधन व इतर माहिती देण्यात आली.

महोत्सवाची व्याप्ती वाढवणार : विश्वजीत राणे

काजू महोत्सवातून पंतप्रधानांचे विकसित भारत आणि मुख्यमंत्र्यांचे आत्मनिर्भर गोवा हे स्वप्न साकारणार आहे. वन विकास मंडळ आणि पर्यटन खात्यातर्फे इको पर्यटनावर भर दिली जाणार आहे. वन खात्यातर्फे सर्व ती मदत या महोत्सला दिली जाणार आहे. काजू महोत्सवाची व्याप्ती अजूनही वाढविला जाणार आहे.

सासष्टीही काजू उत्पादन वाढवणार : दिव्या राणे

आमदार दिव्या राणे म्हणाल्या, की गोव्याचा काजू हा आता फक्त गोव्यापूरती मर्यादित राहिला नसून तो जगप्रसिद्ध झाला आहे. गोवा वनविकास महामंडळाने काजू महोत्सवानिमित्ताने वेगळी ओळख दिली आहे.

महामंडळाने आता स्वतःचा काजू ब्रँड तयार केला तसेच दर्जेदार काजूची रोपटीही तयार केली जात आहेत. महामंडळाकडे ६८५० हेक्टर काजू क्षेत्र आहे. सत्तरी, कणकोण, पेडणे, डिचोली, सांगे, फोंडाप्रमाणे आता सासष्टी तालुक्यात काजू उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाईल.

दालनावरही प्रतिसाद

महोत्सवात ५० पेक्षा जास्त दालने थाटण्यात आली आहे. तेथेही लोकांची गर्दी दिसून आली. त्यात खाद्य पदार्थ तसेच काजूची फेणी, हुहाक व निरा अशा पारंपरिक पेयाची दालने आकर्षित ठरत आहेत.

काजू उत्पादनापासून बनवलेले विविध पदार्थ, स्वयंसाहाय्य गटांनी बनवलेल्या खाद्य पदार्थाची दालनेही होती. स्थानिकांसह पर्यटकांनीही या काजू महोत्सवाचा आस्वाद घेतला.
 

Web Title: goa is the only state that give msp to cashews said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.