गोवा : हरमल येथे पेट्रोल पंपानजिकच्या गवतास आग, परिसरात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:39 IST2023-11-28T16:39:07+5:302023-11-28T16:39:36+5:30
वारंवार अशा आगीच्या घटना परिसरात घडू लागल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.

गोवा : हरमल येथे पेट्रोल पंपानजिकच्या गवतास आग, परिसरात घबराट
हरमल : येथील मधलावाडा- कोरकण भागातील पेट्रोल पंपाच्या ओसाड परिसरात वाळलेल्या गवताला आग लागल्याने एकच घबराट उडाली. सुदैवाने या आगीत फारसे नुकसान झाले नाही. मात्र वारंवार अशा आगीच्या घटना परिसरात घडू लागल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा आगीचा प्रकार घडला. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरली. ही आग शेजारील स्मशानभूमीपर्यंत पोहोचली. याच्या बाजूलाच काजू बागायत आहे. त्यामुळे तेथेही आग पसरण्याचा धोका होता. हरमलचे पंच सदस्य सुशांत गावडे यांनी फोनवरून पेडणे अग्निशमन दलाशी संपर्क साधला. पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीच्या ज्वाळामुळे वीज वाहिन्यांना धोका पोचण्याची शक्यता होतीय. तत्पूर्वीच वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून वीज पुरवठा खंडित करत सहकार्य केले, अशी माहिती पंच गावडे यांनी सांगितले.
दरम्यान, या भागातील काजू बागायत, किनाऱ्यावरील शॅक्स, हट्स परिसरात काही वर्षापूर्वी आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. दरवर्षी काजू बागायती बेचराख होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. आगीच्या घटनाची माहिती पेडणे अग्निशमन दलास दिली जाते. मात्र तेथून अश्निशमन दलाचे बंब पोचण्यासाठी ४० ते ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे या भागात स्वंतत्र अग्निशमन दलाच्या बंबाची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. पर्यटन हंगाम व काजू बागायतीचा मोसम पाहता मांद्रे किंवा हरमल येथे अग्निशमन दलाची गाडी तैनात केल्यास आगीच्या घटनांतून नुकसान टाळता येईल, अशी मागणी पंच गावडे यांनी केली.