Goa Election 2022 : नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्हाला व शरद पवारांना चांगुलपणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:07 IST2022-02-11T20:06:50+5:302022-02-11T20:07:30+5:30
महाराष्ट्रातील सरकारने पहाटे शपथविधी केला नाही, पटोले यांचा टोला

Goa Election 2022 : नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्हाला व शरद पवारांना चांगुलपणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही - नाना पटोले
गणेश तारळेकर
पणजी : "आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काेणत्याही चांगुलपणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, ना शरद पवारांना प्रमाणपत्र गरजेचे आहे," असे परखड मत काँगेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. संसदेत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केलेली स्तुती आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता त्यांनी मत मांडले. त्यांनी पणजी लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे भाषण करु शकतात, यावर विश्वास बसत नाही. देशासमोर बेरोजगारी, कोरोना, कमी होत असलेला विकासदर यावर त्यांनी भाष्य करायला हवे होते, विकासावर बोलायला हवे होते. मात्र एखाद्या टपरीवर चर्चा व्हावी, याप्रमाणे त्यांनी भाषण केले. प्रत्येकवेळी भाषणात पं.नेहरु, इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख करुन जनतेची दिशाभूल मोदी करत आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे मोदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं काम
"महाराष्ट्रात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहाेत. कुणी काहीही वक्तव्ये केली तरी त्याचा आमच्यावर काहीच फरक पडत नाही," असेही मत पटोले यांनी मांडले. आमचे महाराष्ट्रातील सरकार हे कॉमन मिनीमम प्रोगॅमनुसार अस्तित्वात आले आहे. सकाळच्या वेळी शपथ घेऊन आमचे सरकार तयार झाले नाही. सरकारमध्ये समावेश असलेल्या तिन्ही पक्षात सामंजस्य असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेही उपस्थित होते.