Goa Election 2022 : आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झालेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:27 AM2022-01-20T08:27:58+5:302022-01-20T08:29:04+5:30

वाचा कसा होता त्यांचा मेरशीतील एका सर्वसाधारण कुटुंबातील युवक ते ‘आप’च्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इथपर्यंतचा प्रवास.

Goa Election 2022 New entrant Amit Palekar becomes AAPs CM candidate for Goa polls know details | Goa Election 2022 : आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झालेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण?

Goa Election 2022 : आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झालेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण?

Next

पणजी : आम आदमी पक्षाने काल जो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला ते अमित पालेकर हे मेरशी येथील असून ते मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले तरी उच्चशिक्षित आहेत. अनेक घोटाळे फसवणूक आणि बेकायदेशीर बाबी उघड करून सध्याच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरणारे ॲड. अमित पालेकर हे इतरांप्रमाणेच सर्वसामान्य आहेत. सरकारच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्यांना त्यांचे आरामदायी जीवन मागे सोडले आणि भावी पिढ्यांसाठी गोवा जतन करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले. ज्या काळात सर्वांना वाटत होते की,  सामान्य माणसाला काहीही साध्य होणार नाही, तेव्हा पालेकर यांनी ‘सामान्य माणूस जागेल तेव्हा गोवा जिंकेल’ हे विधान करून घरा घरात पोहचले. त्यांनी अनेक अडचणींवर मात करतानाच इथपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला. भंडारी समाजातील पालेकर हे गोव्यातील लोकांसाठी नवीन आशा आहेत.

भंडारी समाज हा गोव्यातील सर्वात मोठा समाज आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात समाजाला योग्य स्थान मिळालेले नाही. भंडारी समाजातून रवी नाईक हे अडीच वर्षे एकच मुख्यमंत्री होते. सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर केल्याने भंडारी समाजाचा विकास झालेला नाही. 

पालेकर यांचे वडील मेरशी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक होते. नंतर पर्वरी मधील होली फॅमिली हायस्कूलमध्ये दाखल झाले. तर त्यांची आई मेरशीमध्ये किराणा दुकान चालवत होती. पालेकर यांनी प्राणीशास्त्रात पदवी प्राप्त केली असून त्यांना एमबीए करण्याची इच्छा आहे. त्यानी प्रवेश परीक्षा दिली होती आणि त्यावेळी दिल्ली आणि बंगळुरूच्या कॉलेजमध्ये त्याची निवड झाली होती. मात्र, वाढीव ट्यूशन फीमुळे त्यांना तेथे प्रवेश घेणे शक्य झाले नाही. आपण वकील व्हावे असे त्यांच्या वडिलांचे नेहमीच स्वप्न असल्याने पालेकर यांनी कायदा क्षेत्र निवडले. गोवा विद्यापीठातून त्यांनी घटनात्मक कायदा आणि बौद्धिक संपदा अधिकार या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. गोवा विद्यापीठात असताना, पालेकर यांनी एका वृत्तपत्रासाठी उपसंपादक म्हणून काम करत स्वत:चा खर्च भागवायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी १९९८ मध्ये एका ज्येष्ठ वकिलाच्या हाताखाली कायद्याचा सराव सुरू केला.

ते २००७ मध्ये रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएराचे अध्यक्ष बनले. पालेकर यांनीच राज्यातील कोविड रुग्णांच्या वाढत्या मृत्यूचे प्रमाण स्पष्ट करून हायकोर्टासमोर ऑक्सिजन फियास्को आणला आणि शेवटी हायकोर्टाच्या मदतीने त्याचे निराकरण करण्यात आले. त्यांनी रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हेरा यांच्यासमवेत सरकारसमोर नव्याने बांधलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये १८५ खाटांची व्यवस्था केली. याव्यतिरिक्त, त्यांनी औषधे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, फ्लोमीटरसह ऑक्सिजन सिलेंडर रेग्युलेटर इत्यादींची काळजी घेतली.   

समाजसेवा करण्यात आनंद मानणाऱ्या पालेकरांनी राजकारणात येण्याचा विचार केला नव्हता. तथापि, साथीच्या रोगानंतर अनेकांनी राजकारणात येण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला. याच क्षणी त्यांनी राज्यात बदल घडवण्यासाठी ‘आप’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. स्वार्थ आणि विविध धार्मिक गटांमधील तेढ असताना अमित पालेकर यांनी आपला जीव धोक्यात घालून जुने गोव्याचे वारसास्थळ वाचवले. ओल्ड गोवा हेरिटेज साइटवर बेकायदेशीर बांधकामाचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे पाच दिवसांचे उपोषण, राज्यातील धार्मिक सौहार्दाचे उत्तम उदाहरण प्रतिबिंबित करते. त्यांनी केलेल्या उपोषणामुळे बेकायदा बांधकामाला परवाना रद्द करण्याचा आदेश देण्याशिवाय सरकारकडे पर्याय नव्हता.

पालेकर यांनी आरोग्य आणि पीडब्ल्यूडी क्षेत्रातील नोकरीतील घोटाळे उघडकीस आणले ज्यामुळे सरकारला भरती प्रक्रिया थांबवावी लागली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याबरोबरच त्यांनी जीएमसी विक्रेत्यांच्या हक्कांचीही वकिली केली.

प्रत्येक क्षेत्रात ठरलेत यशस्वी
पालेकर २००२ मध्ये जीपीएससी परीक्षेत पात्र ठरले. गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही, ते सेवेत रुजू होऊ शकले नाही. कारण त्यांनी अधिकाऱ्यांना लाच देण्यास नकार दिला. त्यानी पुन्हा मामलतदार पदासाठी अर्ज करणाऱ्या सरकारी परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नातही असेच काहीसे घडले. २००७ मध्ये वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर पालेकर यांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता कायद्याचा सराव करायला हवा असा विचार केला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

म्हणून झाली निवड
पालेकर म्हणतात, जेव्हा सामान्य माणूस जागतो तेव्हा गोव्याचा विजय होतो. हे स्वतः आणि त्यांचे गुरू आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. पालेकर, जे मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत, ते या पदाला अनुकूल आहेत, म्हणूनच त्यांची आपचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून निवड करण्यात आली आहे.

Web Title: Goa Election 2022 New entrant Amit Palekar becomes AAPs CM candidate for Goa polls know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app