गोव्याचे सांस्कृतिक वैभव जगासमोर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; फर्मागुडी येथे 'राष्ट्र शंखनाद' महोत्सवाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 07:56 IST2025-05-18T07:56:14+5:302025-05-18T07:56:58+5:30
फार्मागुडी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या शंखनाद महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

गोव्याचे सांस्कृतिक वैभव जगासमोर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; फर्मागुडी येथे 'राष्ट्र शंखनाद' महोत्सवाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गोव्याच्या बाबतीत एक वेगळे चित्र जगभरात निर्माण झाले होते. मात्र ही भूमी देव-देवतांची आहे. या भूमीला एक सांस्कृतिक परंपरा व वैभव आहे. आमच्या सरकारने गोव्याची नकारात्मक जुनी ओळख पुसून टाकली आहे. आज गोवा की भोग भूमी नसून योग भूमी म्हणून जगासमोर पुढे येत आहे. वेद, उपनिषदे शिकवणारी विद्यापीठे इथे साकार होत आहेत, इथे संस्कृत पाठशाळेत देश विदेशातून लोक शिकायला येत आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
फार्मागुडी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी सनातन संस्थेने आयोजित केलेल्या शंखनाद महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कुंडई तपोभूमी मठाधीश ब्रह्मेशानंद स्वामी, देवकीनंदन ठाकूर, म्हैसूर राजघराण्यातील युवराज यदूवीर, कृष्णादत्त वडियार, डॉ. कुंदा आठवले, अभय वर्तक, वीरेंद्र मराठे, चेतन राजहंस व समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, सनातन संस्थेचे काम एका दीपस्तंभाप्रमाणे अविरतपणे चालू आहे. सरकारचे त्यांना पूर्ण सहकार्य आहे. सनातन संस्थेच्या माध्यमातून जी धार्मिक त अध्यात्मिक साहित्य निर्मिती झालेली आहे ती पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. एकेकाळी सूर्यास्त दर्शन, समुद्रकिनारे व समुद्र पाहण्यासाठी लोक इथे येत असत. आज गोव्यातील मंदिरे पाहण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत. संपूर्ण जगातील सर्वात स्वच्छ मंदिरे आज गोव्यात आहेत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटत आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यात्र्यांनी सरकारच्यावतीने डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान केला. तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्र्यांकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला. सुरुवातीला शंखनाद, गणेशवंदना व वेदमंत्रपठण झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
चेतन राजहंस म्हणाले, पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली, तर 'सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण' अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीच 'शंखनाद महोत्सवा'चे आयोजन केले आहे. कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्णादत्त चामराज वाडीयार म्हणाले, अध्यात्म हाच आपला सर्वांचा मूळ गाभा आहे. सनातन राष्ट्र ही राजकीय सत्ताव्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावाने केलेली व्यवस्था आहे.
आध्यात्मिक पर्यटन...
यापुढे मंदिराच्या माध्यमातून आध्यात्मिक पर्यटनास आम्ही नवीन आयाम देणार आहोत. आम्ही नेहमीच आमच्या संस्कृतीला सर्वोच्च प्राधान्य देत आलो आहोत म्हणूनच पोर्तुगीजांनी नष्ट केलेली मंदिरे आम्ही उभी केली. गोमातेच्या रक्षणासाठी तिचा सांभाळ करणाऱ्या लोकांना आम्ही प्रत्येक गायीमागे प्रतीदिन ८० रुपये देत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
धर्म कार्यात सहभागी व्हा!
यावेळी ब्रम्हेशानंद स्वामी म्हणाले, आज समाजात गोव्याची एक सात्त्विक परशुराम भूमी म्हणून गोव्याची ओळख सनातन संस्थेच्या कार्यामुळे निर्माण झाली आहे. सनातन धर्म टिकल्यानंतरच जगात विश्वास अन् शांती निर्माण होईल. आज हिंदू जागा न झाल्यास उद्याचा दिवस आपला राहणार नाही. सर्व समाजाने सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे.