गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2025 09:27 IST2025-02-23T09:26:55+5:302025-02-23T09:27:53+5:30
गोव्यातील राजकीय स्थितीविषयी मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांच्याशी कोणती चर्चा झाली ते कळू शकले नाही.

गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : घनकचरा व्यवस्थापनात गोव्याच्या यशस्वी मॉडेलची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पश्चिम राज्यांच्या बैठकीत दिली. या बैठकी दरम्यान व नंतर काही विषयांवर मुख्यमंत्री सावंत यांची शाह यांच्याशी चर्चाही झाली.
पुणे येथील बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा नगर हवेली आणि दमण-दीवचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. अन्य काही मंत्री आणि अधिकाऱ्यांनी भाग घेतला. या बैठकीत पश्चिम विभागातील प्रमुख विकासात्मक प्राधान्यांवर सखोल चर्चा झाली. ज्यामध्ये प्रादेशिक विकास आणि सहकार्याला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश होता. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यात यशस्वीपणे राबवलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची माहिती दिली. यासंबंधी गोव्याचे मॉडेल हे अत्यंत सुटसुटीत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवा सरकार घनकचरा व्यवस्थापनात राबवीत असलेल्या उपक्रमांबद्दल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी गोव्याच्या मॉडेलचे कौतुक केले.
मंत्रिमंडळात बदल शक्य
गोव्यातील राजकीय स्थितीविषयी मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांच्याशी कोणती चर्चा झाली ते कळू शकले नाही. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी मात्र मुख्यमंत्री सावंत यांची चर्चा झाली आहे. गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना लवकरच होईल. दिगंबर कामत व रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा झाल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र याबाबत मिडियाला कोणतीच माहिती दिलेली नाही.