गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारी मंत्रालयात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 14:08 IST2018-09-07T14:05:29+5:302018-09-07T14:08:27+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून गोव्यात दाखल झाले तरी, ते प्रत्यक्ष मंत्रालयात येत्या सोमवारी येऊन काम सुरू करणार आहेत.

Goa Chief Minister Parrikar will visit Mantralaya on Monday | गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारी मंत्रालयात येणार

गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारी मंत्रालयात येणार

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून गोव्यात दाखल झाले तरी, ते प्रत्यक्ष मंत्रालयात येत्या सोमवारी येऊन काम सुरू करणार आहेत. अमेरिकेहून मुंबई व मुंबईहून गोवा अशा प्रवासामुळे मुख्यमंत्र्यांना थोडा थकवा आलेला आहे. तूर्त ते दोनापावल येथील आपल्या निवासस्थानाहून काही प्रमाणात काम करत आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेहून वैद्यकीय उपचार घेऊन गुरुवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. त्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता व सत्ताधारी आघाडीतील काही जणांचा त्या प्रयत्नांना छुपा पाठिंबा होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

मुख्यमंत्री वारंवार वैद्यकीय उपचारांसाठी गोव्याबाहेर राहत असल्याने व मुख्यमंत्रीपदाच्या कामाचा ताबाही गोव्यातील कुठल्याच मंत्र्याला देत नसल्याने विरोधी काँग्रेस पक्षाने गेले अनेक दिवस ओरड चालवली होती. शुक्रवारी सकाळी तर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेसने राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेतली व गोव्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असल्याची तक्रार केली. 

मुख्यमंत्री तूर्त दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी असून ते फोनवरून वरिष्ठ सरकारी अधिका-यांच्या संपर्कात आहेत. एरव्ही गोव्यात असतात तेव्हा रोज सकाळी मुख्यमंत्री पर्वरी येथील मंत्रलयात तथा सचिवालयात येतात व तिथूनच सगळे शासकीय काम हाताळतात. शुक्रवारी मुख्यमंत्री मंत्रलयात आले नाही. गेले बरेच आठवडे मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली नाही. प्रशासनही संथ झालेले आहे. कारण आणखी दोन मंत्री गेले काही महिने इस्पितळातच आहेत. मुख्यमंत्री येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेतील असे सुत्रंनी सांगितले. मुख्यमंत्री सोमवारी मंत्रलयात दाखल झाल्यानंतरच कामाला वेग येईल. शनिवार व रविवारी सुट्टीच असते. मुख्यमंत्री काहीवेळा सुटीच्या दिवसांतही मंत्रालयात येतात पण आरोग्याच्या कारणास्तव यावेळी ते थोडा आराम करत आहेत.

 

Web Title: Goa Chief Minister Parrikar will visit Mantralaya on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.