Goa casino Big Daddy owner became Mla in Haryana; king maker for BJP | गोव्याच्या कॅसिनोचा मालक बनला हरियाणाचा आमदार; भाजपासाठी ठरणार किंगमेकर
गोव्याच्या कॅसिनोचा मालक बनला हरियाणाचा आमदार; भाजपासाठी ठरणार किंगमेकर

मुंबई : वादग्रस्त उद्योजक आणि गोव्यातील बिग डॅडी कॅसिनोचा मालक गोपाऴ कांडा यांनी नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळविला आहे. सिरसा या त्यांच्या घरच्या मतदारसंघातून जिंकत देशातील पहिले कॅसिनोचे मालक आमदार बनले आहेत. 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार कांडा यांनी त्यांच्याच पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. हरियाणा लोकहित पार्टी असे या पक्षाचे नाव असून त्यांनी अपक्ष उमेदवार गोकुळ सेटीया यांच्यावर अवघ्या 602 मतांनी मात केली आहे. 

कांडा यांनी 2009 मध्ये इंडियन लोक दल (INLD) चे अजय चौटाला यांच्याविरोधात 2009 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. यानंतर ते काँग्रेसच्या भुपिंदर सिंह हुडा यांच्या सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. मात्र, 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. 

हरियाणा लोकहित पक्षाच्या या नेत्याची पार्श्वभुमीही मोठी वादग्रस्त आहे. कांडा यांची गोल्डन ग्लोब हॉटेल्स ही कंपनी आहे. जी देशभरात विविध हॉटेल्स, मॉल्स आणि गोव्यातील नुकताच सुरू झालेला बिग डॅडी कॅसिनो चालविते. 2005 मध्ये कांडा यांनी एमडीएलआर नावाची विमान वाहतूक कंपनी सुरू केली होती. मात्र, नंतर ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. कांडा यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणे, गुन्हेगारी धमकी देणे, गुन्हेगारी कट रचणे, आयकर चुकवणे आणि चेक बाउन्स होण्याची प्रकरणे आहेत. 

एअरहॉस्टेसला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गंभीर गुन्हाही त्यांच्यावर नोंद आहे. 

निवडणूक आयोगाला दिलेल्या विवरणानुसार कांडा यांची संपत्ती 95.5 कोटींची आहे. भाजपाला बहुमत न मिळाल्याने एकमेव आमदार असलेल्या या पक्षाला पर्यायाने कांडा यांना खूप महत्व प्राप्त झाले आहे. हरियाणामध्ये आता अपक्षांच्या टेकूने सरकार स्थापन करता येणार आहे.

Web Title: Goa casino Big Daddy owner became Mla in Haryana; king maker for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.