गोवा आयुर्वेद पर्यटनाचे केंद्र बनण्यास सक्षम: राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:05 IST2025-09-24T12:04:36+5:302025-09-24T12:05:24+5:30
धारगळमध्ये केंद्रीय आयुर्वेद संस्थान आयोजित आयुर्वेद दिन, भारतीय आयुर्वेद पुरस्कार वितरित

गोवा आयुर्वेद पर्यटनाचे केंद्र बनण्यास सक्षम: राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू
लोकमत न्यूज नेटवर्क, मोपा : गोवा हे लहान राज्य असले तरी येथील समुद्र, नद्या, डोंगर, वनराई आणि शेतीमुळे ते नैसर्गिक संपत्तीने समृद्ध आहे. त्यामुळे गोव्याला जागतिक स्तरावर आरोग्य व आयुर्वेद पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी केले.
राज्यपाल हे केंद्रीय आयुर्वेद संस्थान आयोजित आयुर्वेद दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री प्रातापराव जाधव, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर, अधिष्ठाता सुजाता कदम, केंद्रीय संस्थान संचालक पी. के. प्रजापती आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात आयुर्वेद ही भारताची प्राचीन परंपरा असल्याचे सांगितले. कार्यक्रमात डॉ. बनवारीलाल गौर, पी. एन. मुसा आणि वैद्य भावना पराशर यांना भारत सरकारचा भारतीय आयुर्वेद पुरस्कार देऊन प्रत्येकी पाच लाख रुपये, शाल, मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी योग प्रात्यक्षिक व सांस्कृतिक नृत्य झाले. सूत्रसंचालन अभिनेत्री जुही मल्होत्रा यांनी केले, तर आभार अधिष्ठाता सुजाता कदम यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
आयुर्वेदातून वनस्पतींचे संवर्धन : मंत्री जाधव
केंद्रीय आयुष्यमंत्री प्रातापराव जाधव यांनी आयुर्वेद केवळ रोगनिवारणापुरते मर्यादित नसून पर्यावरण रक्षण, औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि उत्पादन क्षमतेत वाढ करणे हेदेखील त्याचे महत्त्वाचे ध्येय असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले असून आज देशाला या क्षेत्रात विशेष ओळख मिळाली आहे, असे ते म्हणाले. तसेच गोवा सरकारने आयुर्वेद संस्थानासाठी अधिक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
देशाला अच्छे दिन आयुर्वेदामुळेच : मुख्यमंत्री सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, 'देशाला अच्छे दिन आयुर्वेदामुळेच मिळाले आहेत. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या आयुष मंत्रालयाने अनेक शाखांद्वारे देशभर महाविद्यालये सुरू केली असून आज हजारो विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. धारगळ येथील महाविद्यालयात रोज आठशेहून अधिक रुग्ण ओपीडी सेवा घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर "आयुर्वेद जीवनाचा आत्मा आहे आणि त्याच्यामुळे स्वस्त भारत -समृद्ध भारत घडविण्याची क्षमता आहे," असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.