Goa: बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू, मृत तरुण जम्मू कश्मीरमधील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 17:07 IST2023-10-18T17:06:30+5:302023-10-18T17:07:30+5:30
Goa: हरमल येथील 'स्वीट लेक'जवळ समुद्रात बुडून जम्मू कश्मीरच्या दोन पर्यटकांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. अमनदीप (२८) व अभिषेक (३४) अशी मृतांची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत.

Goa: बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आलेल्या सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू, मृत तरुण जम्मू कश्मीरमधील
- चंद्रहास दाभोलकर
हरमल - हरमल येथील 'स्वीट लेक'जवळ समुद्रात बुडून जम्मू कश्मीरच्या दोन पर्यटकांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. अमनदीप (२८) व अभिषेक (३४) अशी मृतांची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी हरमल येथील स्वीट लेकजवळील समुद्रात दोघेजण बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेहबाहेर काढले. दोघेही जम्मू काश्मिर येथील आहे. त्यांच्यासोबत सुमित श्रीवास्तव (३३) व रुहान गुजरा (२८) हे दोघे मित्र होते. अभिषेक याचे लग्न ठरले होते. त्यामुळे बॅचलर पार्टीसाठी हे सर्वजण रविवारी गोव्यात आले होते.
दरम्यान, आज सकाळी अभिषेक व अमन इतर दोन मित्रांसह हरमल येथील स्वीट लेक तळ्याजवळील समुद्रात आंघोळी आले होते. चौघेही पाण्यात उतरले होते. यातील अमनदीप व अभिषेक यांना अंदाज न आल्याने ते खोल समुद्रात गेले व तिथेच बुडाले. दोघेही बुडत असल्याचे मित्र रुहान व सुमित यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडा ओरड सुरू केली. परंतु, वेळीच मदत न मिळाल्याने ते बुडाले.
घटनास्थळी उपस्थिती काहींनी तातडीने पेडणे अग्निशमन दलाला संपर्क करून माहिती दिली. अग्निशमनचे जवान दाखल झाले व बचाव कार्य सुरू केले. दोन तासानंतर दोघाही भावांचे मृतदेह मिळाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. पुढील तपास पेडणे पोलीस उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.