फुटीरतेला पायबंद घालण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून नेत्यांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 07:13 PM2019-06-11T19:13:46+5:302019-06-11T19:21:29+5:30

आमदारांनी पक्षातून फुटू नये म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आवाज उठवत असतानाच आता भाजपच्याही काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेऊ नका, असे  आपल्या नेत्यांना स्पष्टपणे बजावले आहे.

Goa BJP News | फुटीरतेला पायबंद घालण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून नेत्यांची कोंडी

फुटीरतेला पायबंद घालण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांकडून नेत्यांची कोंडी

Next

पणजी  - आमदारांनी पक्षातून फुटू नये म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आवाज उठवत असतानाच आता भाजपच्याही काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेऊ नका, असे  आपल्या नेत्यांना स्पष्टपणे बजावले आहे. सांतआंद्रेचे काँग्रेस कार्यकर्ते फ्रान्सिस सिल्वेरा यांना पक्षात घेतले जाणार नाही, अशी ग्वाही देण्यास सांतआंद्रेतील भाजप कार्यकर्त्यांनी  मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना भाग पाडले.

काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, अशा अर्थाची विधाने लोकसभा निवडणूक निकाल लागला त्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी केली होती. त्यानंतर सांतआंद्रे, कुंकळ्ळी व अन्य काही मतदारसंघांमधील काँग्रेस आमदार व भाजपच्या काही नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या असल्याची चर्चा पसरली. आमच्या आमदारांना भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी थेट सांगत भाजपच्या काही नेत्यांना दबावाखाली आणले. आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी तर सांतआंद्रेतील काही लोकांना व भाजप कार्यकर्त्यांना आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असे सांगणेच सुरू केल्याची माहिती भाजपच्या सांतआंद्रेतील प्रमुख कार्यकर्त्यांना मिळाली. भाजपमध्ये हे सगळे चालले आहे तरी काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला. 

भाजपचे सांतआंद्रे मंडळाचे अध्यक्ष रविंद्र बोरकर तसेच 2017 साली भाजपच्या तिकीटावर लढलेले उमेदवार रामराव वाघ व इतरांनी मंगळवारी पणजीतील भाजप कार्यालय गाठले. तेंडुलकर तिथे उपस्थित होते. आम्हाला वस्तुस्थिती काय ते सांगा, तसेच सिल्वेरा यांना भाजपमध्ये घेऊ नका, कारण सांतआंद्रेत आम्ही खूप कष्ट घेऊन भाजपला बळकट केले आहे व त्यामुळे सिल्वेरा घाबरलेत, असे कार्यकर्त्यांनी तेंडुलकरांना सांगितले. आम्ही कुणालाच भाजपमध्ये घेणार नाही, तसा प्रस्तावच नाही. काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये येण्यास तयार असले तरी, आम्हाला विद्यमान सरकारमध्ये वाद निर्माण करायचा नाही, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले. सिल्वेरा यांना पक्षात प्रवेश देऊ नका अशी विनंती करणारे पत्रही कार्यकर्त्यांनी तेंडुलकर यांना दिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही या पत्राची प्रत पाठवली गेली. सिल्वेरा यांना पक्षात घेण्याचा प्रस्ताव नाही, असे तेंडुलकर यांनी मग पत्रकारांनाही सांगितले.

Web Title: Goa BJP News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.