पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:21 IST2025-06-19T11:18:58+5:302025-06-19T11:21:34+5:30

साखळीत दिंडी व हरिपाठ कार्यक्रम मुख्यमंत्री भजनात झाले दंग

goa bhavan to be built in pandharpur cm pramod sawant announcement | पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : पंढरपूर येथे गोव्यातून वर्षभर जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी गोवा सरकारतर्फे गोवा भवन साकारण्याचा सरकारचा मनोदय असून तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या आपण संपर्कात आहे. सुमारे ४ हजार चौरस मीटर जागा गोवा सरकारला मिळाल्यास अयोध्या भवनाप्रमाणेच पंढरपुरातही गोवा श्री विठ्ठल भवन सरकार सरकारणार आहे. त्यामुळे गोव्यातील लोकांना निवासासाठी चांगली सोय होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवन येथे केले.

साखळी रवींद्र भवनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिंडी व हरिपाठ या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासह रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर तसेच न्हावेली, अमोणा व विठ्ठलापूर साखळी येथील पंढरपूर पायी वारीचे प्रमुख उपस्थित होते. वारकऱ्यांच्या तसेच गोव्यातील असंख्य विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी पंढरपुरात गोवा भवन उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून जागेची व्यवस्था होताच लवकरच गोवा भवन पंढरपुरात साकार केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

यावेळी वारकरी मंडळांनी रवींद्र भवनच्या बाहेरून दिंडी घालत तसेच विठू नामाचा जोरदार गजर करत रवींद्र भवनचा परिसर दणाणून सोडला. ही दिंडी बाहेरून रवींद्र भवानात आल्यानंतर मुख्य जागेत वारकरी मंडळातर्फे हरिपाठ सादर करण्यात आला. या हरीपाठात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही वारकऱ्यांबरोबर बसून सहभागी झाले त्यांनीही हातात टाळ घेऊन हरिपाठाचा ठेका धरला व विठू नामाचा गजर केला.

 

Web Title: goa bhavan to be built in pandharpur cm pramod sawant announcement