मराठीला राजभाषा करावी: मांद्रेचे आमदार जीत आरोलकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:20 IST2025-07-25T08:19:12+5:302025-07-25T08:20:04+5:30
अधिवेशनात शून्य तासावेळी मागणी

मराठीला राजभाषा करावी: मांद्रेचे आमदार जीत आरोलकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मराठी भाषेला कोंकणीसह राजभाषेचा दर्जा देणे आवश्यक आहे. राज्याची संस्कृती, परंपरा, धार्मिक विधी, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि साहित्यात मराठीचे खोलवर रुजलेले अस्तित्व असूनही, राज्य सरकारने या भाषेला अद्याप मान्यता दिलेली नाही. सरकारने मराठीला राजभाषा म्हणून मान्यता द्यावी आणि मराठीला दुसरी अधिकृत भाषा म्हणून अधिसूचित करावी, अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी अधिवेशनाच्या शून्य तासात केली.
मराठी भाषा आणि मराठीप्रेमींवर आतापर्यंत अन्यायच होत आला आहे. गणेश चतुर्थीवेळी किंवा इतर धार्मिक विधीदरम्यान म्हणणाऱ्या आरत्या मराठीच आहेत. राज्यातील बहुतांश वृत्तपत्रे मराठी असल्याचे म्हणाले. अनेकांना मराठी वृत्तपत्रातच बातम्या यायला हव्या असतात, पण मराठीला महत्त्व दिलेले अनेकांना पटत नाही. अनेक वर्षांपासून मराठी राजभाषेसाठी मागणी होत आहे, त्यामुळे यंदा तरी ही मागणी पूर्ण व्हावी, असेही आरोलकर यांनी सांगितले.
मागणीला जोरदार आक्षेप
आरोलकर यांनी ही मागणी करताच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या मागणीला जोरदार आक्षेप घेतला. हा विषय आरोलकर शून्य तासात मांडू शकत नाही, हे अधिकृत भाषा कायद्याचे उल्लंघन आहे. हा विषय मांडायचा असेल तर यावर कायदा दुरुस्ती आणावी असे सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून हस्तक्षेप
जीत आरोलकर मराठीसाठी मागणी करत असताना बोलत कोंकणीत आहेत, असा टोलाही सरदेसाई यांनी लगावला, याला प्रत्युतरात मात्र आरोलकर यांनी म्हटले की, मी मराठी दुसरी भाषा करावी अशी मागणी केली आहे, हे सरदेसाई यांनी नीट ऐकलेले नसावे. अखेर मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून शून्य तासात या गोष्टीचा उल्लेख करण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगत एकाप्रकारे आरोलकर यांना पाठिंबा दिला.