गोव्यात न्युड पार्टीची जाहीरात करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 20:43 IST2019-09-30T20:27:58+5:302019-09-30T20:43:30+5:30
गोव्यात न्युड पार्टीच्या आयोजनाची केवळ हवा निर्माण करून अॅानलाईन नोंदणीच्या निमित्ताने मोठी रक्कम जमविणे व ग्राहकांची फसवणूक करणे एवढाच हेतू न्युडपार्टीची जाहीरात करणाऱ्याचा होता.

गोव्यात न्युड पार्टीची जाहीरात करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्याला अटक
पणजी: गोव्यात न्युड पार्टीच्या आयोजनाची केवळ हवा निर्माण करून अॅानलाईन नोंदणीच्या निमित्ताने मोठी रक्कम जमविणे व ग्राहकांची फसवणूक करणे एवढाच हेतू न्युडपार्टीची जाहीरात करणाऱ्याचा होता. या फसवणुकीचा बेत रचून गोव्याचेही नाव खराब करणाऱ्या बिहार येथील अरमान मेहता (३०) याला गोवा पोलिसांनी अटक करून आणले आहे.
गोव्यात कुणीही न्यूड पार्टीचे वगैरे आयोजन करण्यात आलेले नाही. गोवा पर्यटन केंद्र म्हणून जागतीक नकाशावर आहे आणि याचाच फायदा करून पैसा कमाविण्याच्या दृष्टीने ही खोटी जाहिरात बाजी करण्याचा अरमानचा डाव होता. अश्वें मांद्रे येथे न्यूड पार्टीचे आयोजन असल्याचे त्याने जे जाहीरातीत म्हटले होते त्या भागात एक वर्षापूर्वी तो मित्राबरोबर येवून गेला आहे. त्यामुळे या भागाचे नाव त्याच्या लक्षात राहिले होते. जे नग्न फोटो त्याने जाहिरातीत वापरले होते ते त्याने इंटरनेटवरून डाऊनलोड केले होते. त्याच्या
फोन क्रमांकासह ही जाहीरात सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आल्यानंतर त्याच्या अंदाज खरा ठरताना त्याला मोठ्या प्रमाणावर फोन येवू लागले. परंतु हे फोन फारच मोठ्या प्रमाणावर येवू लागल्यामुळे तो घाबरला आणि त्याने फोनच बंद ठेवला. त्यामुळे नोंदणीच्या नावाने पैसे वगैरे मिळविण्याचा त्याचा पुढचा बेत त्याला टाकून द्यावा लागला.
पोलिसांना चुकविण्यासाठी
जाहिरात व्हायरल झाल्यानंतर या संबंधी बातम्याही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होवू लागल्या आणि मुख्यमंत्र्यांनी तपासाचाही आदेश दिला. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर आहेत हे त्याने हेरले आणि फोन तर बंद ठेवलाच, शिवाय अनेकवेळा तो आपले स्थान (लॉकेशन) बदलत राहिला. उत्तर प्रदेश, पश्चीम बंगाल आणि बिहार अशा ठिकाणी तो फीरला. शेवटी बिहारमधील त्याच्या जन्मगावी कतिहार येथे पोलीसांनी त्याला पकडले. उपअधीक्षक महेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली त्याला शोधण्यासाठी क्राईम ब्रँचचे पथक निघाले होते.
कोण हा अरमान
अरमान मेहता हा तसा सुशिक्षित व विवाहीत युवक. डेहराडून येथे बीसीएचा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडून त्याने संगणकाचे शिक्षण घेतले. नंतर इवेंट आर्गनायजर म्हणून त्याने काम केले. त्यात अलिकडच्या काळात त्याला कामेही कमी मिळू लागली होती. शिवाय दारू व मैत्रिणीच्या नादामुळे त्याने असलेले पैसेही संपविले होते. न्यूडपार्टीच्या आयोजनाचे नाटक त्याने निव्वळ लोकांची फसवणूक करून पैसे कमाविण्यासाठी रचले होते.