गोव्याने राष्ट्रवादासोबत प्रगती साधली; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:36 IST2025-11-01T10:36:30+5:302025-11-01T10:36:55+5:30
रन फॉर युनिटीला उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यभर विविध कार्यक्रम

गोव्याने राष्ट्रवादासोबत प्रगती साधली; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले असले तरीदेखील आम्ही कुठेच मागे राहिलो नाही. उलट इतर काही राज्यांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे आहोत. राज्याने राष्ट्रवाद तेवत ठेवत राष्ट्रीय प्रगतीसोबतच पावले उचलली आहेत,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पटेल यांना काल कांपाल-पणजी येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी रन फॉर युनिटीला मुख्यमंत्री सावंत यांनी हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोवा हे समान नागरी संहिता लागू करणाऱ्या पहिल्या राज्यांपैकी एक आहे. आता एवढी प्रगती राज्याने केली आहे की विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवरील क्रीडा स्पर्धाचे यजमानपद आम्ही भूषवत आहोत.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सरदार पटेल यांनी लहान-लहान गावांना एकत्रित करून देश उभारण्यावर भर दिला. संस्कृती, वेशभूषा, भाषा, धर्म विविध असूनही आम्ही एकत्र नांदत आहोत. पटेल यांनी विविधतेत एकतेचा संदेश दिला. पटेल यांचे कार्य लोकांसमोर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रनची संकल्पना मांडली.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राज्यभर तालुका स्तरावर या रनचे यशस्वीरीत्या आयोजन केले. अखंडता आणि राष्ट्रनिर्माण हेच एक भारत, श्रेष्ठ भारताचा पाया मजबूत करणारे आदर्श आहेत. २०४७ पर्यंत नवीन ऊर्जेने आणि उद्देशाने विकसित भारताकडे वाटचाल करण्याची गरज आहे. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही कांडावेलू, क्रीडासचिव संतोष सुखदेवा, क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक डॉ. अजय गावडे, नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ उपस्थित होते.
अखंडतेची शपथ
पणजीतील या रन फॉर युनिटीमध्ये शंभरपेक्षा जास्त लोकांना सहभाग घेतला होता. तसेच या दरम्यान सहभागींनी भारतात अखंडता, एकतेची शपथही देण्यात आली.