आई-वडिलांसमोर मुलीने घेतली पुलावरून नदीत उडी
By Admin | Updated: December 27, 2015 01:27 IST2015-12-27T01:27:40+5:302015-12-27T01:27:51+5:30
फोंडा : समजूत घालणाऱ्या आई-वडिलांसमोर मानसिक तणावाखाली असलेल्या मुलीने बोरी पुलावरून अचानक नदीत उडी

आई-वडिलांसमोर मुलीने घेतली पुलावरून नदीत उडी
फोंडा : समजूत घालणाऱ्या आई-वडिलांसमोर मानसिक तणावाखाली असलेल्या मुलीने बोरी पुलावरून अचानक नदीत उडी घेतली. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डॉम्निका परेरा (वय ३०, रा. उजरो-राय, सासष्टी) असे मुलीचे नाव आहे. या आघातामुळे आंजेलो परेरा आणि मातालिल्ड परेरा हे माता-पिता हादरून गेले. रात्री उशिरापर्यंत डॉम्निका परेरा हिचा पोलिसांना शोध लागला नव्हता. दरम्यान, मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी डॉम्निका बेपत्ता झाल्याची तक्रार झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, दुपारच्या सुमारास डॉम्निका हिला आपल्या माता-पित्यासह बोरी पुलावर तावातावाने चर्चा करताना अनेक लोकांनी पाहिले होते. तेथून ये-जा करणाऱ्या काही लोकांनी याची दखल घेतली असता या तिघांनी त्यांना हा आपला कौटुंबिक प्रश्न असल्याचे सांगितले. मध्यस्थी करू इच्छिणाऱ्यांना त्यांनी नाकारले. त्यामुळे कोणी त्यात हस्तक्षेप केला नाही. सुमारे तास दीड तास आई-वडिलांशी हुज्जत घातल्यानंतर डॉम्निका हिने पुलाच्या कठड्यावरून स्वत:ला नदीत झोकून दिले.
हा प्रकार पाहिलेल्या स्थानिकांनी फोंडा पोलिसांना याबाबत कल्पना दिली. फोंडा पोलिसांनी अग्निशमन दलाला कळवून घटनास्थळी डॉम्निका परेरा हिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती न मिळाल्यास उद्या रविवारीही पुन्हा शोध मोहीम सुरू राहील, असे सांगण्यात आले.
पोलिसांनी डॉम्निका हिच्या पालकांशी प्राथमिक संवाद साधला असता, काही दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती मिळाली. तणावाचे कारण लगेचच समजू शकले नाही. (प्रतिनिधी)