पर्पल फेस्टला सरकारकडून पूर्ण पाठिंबा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:44 IST2025-06-05T07:43:23+5:302025-06-05T07:44:08+5:30
खोर्ली - म्हापसा येथे आस्था आनंद निकेतनच्या सेंटरचे उद्घाटन

पर्पल फेस्टला सरकारकडून पूर्ण पाठिंबा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पर्पल फेस्टला अत्यंत चांगला पाठिंबा लाभला. राष्ट्रीय स्तरावर त्याची प्रशंसा करण्यात आली. त्यामुळे पुढील पर्पल फेस्टसाठी सरकारकडून पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी एका कार्यक्रमात केली.
खोर्ली-म्हापसा येथील आस्था आनंद निकेतन या दिव्यांगांसाठीच्या नव्या सेंटरचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, उपसभापती जोशुआ डिसोझा, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर, संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश कोटकर, पद्मश्री दीपा मलिक आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
साडेबारा कोटी खर्च
दिव्यांगासाठी सर्व प्रकारच्या सुविधांयुक्त या सेंटरच्या उभारणीचे काम सुमारे अडीच वर्षांपूर्वी हाती घेतले. त्यावर सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पण विविध स्तरांवरून लाभलेल्या सहकार्यामुळे प्रकल्पावर १२ कोटी ५० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रा. अनिल सामंत यांनी प्रकल्पाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. प्रकल्पाच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी सूत्रसंचालन केले.