पूर्ण दारूबंदीमुळे प्रश्न सुटत नसतात

By Admin | Updated: January 31, 2015 02:32 IST2015-01-31T02:31:25+5:302015-01-31T02:32:30+5:30

पोपटराव पवार : व्यसनांविषयी शालेय स्तरापासून प्रबोधनाची गरज

Full liberation does not solve the problem | पूर्ण दारूबंदीमुळे प्रश्न सुटत नसतात

पूर्ण दारूबंदीमुळे प्रश्न सुटत नसतात

पणजी : पूर्ण दारूबंदी केल्यामुळे प्रश्न सुटत नसतात, त्याऐवजी नियंत्रण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. ते रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट परिषदेच्या निमित्ताने येथे आले होते. हिवरेबाजार (जि. अहमदनगर, महाराष्ट्र) येथे जलसंवर्धन आणि अन्य विकासकामांमुळे पोपटराव पवार यांचे नाव सामाजिक क्षेत्रात सर्वदूर झालेले आहे. येथे कला अकादमीत त्यांनी ‘रोटरीशिवाय जग’ या विषयावर रोटरियन्सना मार्गदर्शन केले.
गोवा आणि दारू याविषयी जगभर निश्चित काही प्रतिमा आहे. गोवा म्हणजे मौजमजा, असे समीकरणही झालेले आहे. या पर्यटन राज्याची ती ओळख आहे. पोपटराव पवार यांनी व्यसनमुक्तीसाठीही काम केलेले आहे. त्यामुळे दारू या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्र असो नाहीतर गोवा, आपल्याकडे देशातच दारू पिण्याचे प्रमाण आणि पध्दत अयोग्य असल्याचा त्यांच्या बोलण्याचा सूर जाणवला. युरोपीयन देशांत सर्व कुटुंब एकत्र बसून दारू पितात. युरोपीयन देशामध्ये दारू कशी प्यावी, हे शिकवले जाते. आपणही तसे शिकवावे असे नव्हे, असे पवार यांनी स्पष्ट केले. अन्य देश आणि आपणात सर्व प्रकारचे मोठे अंतर असल्याचेही त्यांनी नमूद केले. आनंद झाला म्हणून दारू प्यायची, मग नोकरी मिळाली यासारखी कारणेही पुरेशी ठरतात. दु:ख झाले म्हणून दारू पिली जाते. दोन्हीही बाबी अयोग्य आहेत. नानाविध कारणांमुळे विषादाचे (त्यांचा शब्द डिप्रेशन) प्रमाण वाढल्यामुळेही लोक व्यसनाच्या आहारी जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. शालेय स्तरावर व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगायला पाहिजेत. तसे हिवरेबाजार या गावात आम्ही समाजावून सांगतो, अशी माहिती त्यांनी दिली. प्रबोधन करणे हा उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले.
शालेय मुलांना, तरुणांना काही वर्षांपूर्वी शाळा, व्यायामशाळा, क्रीडांगणे, मनोरंजनाची सशक्त साधने यांसारखे खूप पर्याय होते. त्यामुळे या अन्य क्षेत्रांमध्ये तरुणाई गुंतली जात होती. मात्र, आता अनेक ठिकाणचे चित्र बदलले आहे. अनेक औषधांमध्येही दारूचा वापर केलेला असतो, त्यामुळे पूर्ण दारूबंदीपेक्षा नियंत्रण महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पूर्ण दारूबंदीने प्रश्न सुटत नसतात, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Full liberation does not solve the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.