नोकर भरतीसाठी यापुढे गोव्यातच मुलाखती घ्या!; राज्यातील खासगी उद्योगांना मुख्यमंत्री सावंत यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:46 IST2025-09-14T12:45:16+5:302025-09-14T12:46:07+5:30
गोव्यातील पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया ही गोव्यातच झाली पाहिजे, असे उद्योगांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली.

नोकर भरतीसाठी यापुढे गोव्यातच मुलाखती घ्या!; राज्यातील खासगी उद्योगांना मुख्यमंत्री सावंत यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात उद्योग उभारलेल्या खासगी कंपन्यांनी यापुढे नोकर भरतीसाठी गोमंतकीयांनाच प्राधान्य द्यावे. तसेच त्यासाठी मुलाखतीही गोव्यातच घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्योगांना दिले आहेत.
राज्य सरकारच्या सवलती, साधन सुविधांचा लाभ घेऊन जेव्हा गोव्यात उद्योग सुरू करतात, तेव्हा गोमंतकीयांना त्याचा फायदा झाला पाहिजे. विशेषतः रोजगारनिर्मितीच्या बाबतीत गोमंतकीयांनाच प्राधान्य देणे बंधनकारक आहे. तसेच गोव्यातील पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया ही गोव्यातच झाली पाहिजे, असेही उद्योगांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली.
गोव्यात उद्योग असलेल्या 'एमआरएफ' कंपनीने फोंड्यातील युनिटमध्ये प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या २५० जागा भरण्यासाठी कुडाळ-सिंधुदुर्ग येथे भरती मेळाव्याची जाहिरात दिल्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी सरकारवर टीका करताना या उद्योगांना वेळीच आवरा, अशी सूचना केली होती. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई तसेच आरजी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना याविषयी विचारले तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, नोकर भरती गोव्याबाहेर घडवून आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यात आरजीचे मनोज परब यांनी या उद्योगांना आता रोखले नाही तर गोमंतकीय तरुण बेरोजगारच राहतील, असे म्हटले आहे. या कंपन्यांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
गोव्यात उद्योग असलेल्या कंपन्यांकडून नोकर भरती प्रक्रिया गोव्याबाहेर करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. गुजरात आणि इतर राज्यांतही नोकर भरतीच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यावेळीही विरोधी पक्षाने आवाज उठविला होता. तसेच हा मुद्दा गोवा विधानसभेच्या अधिवेशनातही अनेकवेळा गाजलेला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना उद्योगांनी गोव्यातील लोकांनाच रोजगारासाठी प्राधान्य देण्यास आपण सक्तीचे करू, असे आश्वासनही दिले.