फोंडा पोटनिवडणूक: सर्वच पक्ष नेतृत्वाचा कसोटी काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:45 IST2025-10-29T07:45:00+5:302025-10-29T07:45:30+5:30
उमेदवारी न मिळाल्यास आरपारच्या लढाईस भाटीकर सज्ज

फोंडा पोटनिवडणूक: सर्वच पक्ष नेतृत्वाचा कसोटी काळ
अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : फोंडा विधासनभा मतदारसंघासाठी होणारी आगामी पोटनिवडणूक ही मगो, भाजप व काँग्रेस पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यासाठी कसोटीची ठरणार आहे. त्यांच्या पक्ष निष्ठेचा कस लागणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. संपूर्ण फोंडा तालुक्यात मतदार आपल्या परीने तर्क लावण्यात गर्क असतानाच पणजी व दिल्लीमध्ये नेमके काय घडते यावर या नेत्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
मगो पक्षाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास डॉ. केतन भाटीकर हे आरपारची लढाई लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी थेट सांगितले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आज संपूर्ण सोशल मीडियावर केतन भाटीकर यांचे ते वक्तव्य व एका खाजगी राज चॅनलला दिलेली मुलाखत धुमाकूळ घालत आहे.
मगो नेते तथा वीज मंत्री सुदिन ढवळीकर म्हणत आहेत की, ते केतन भाटीकर यांच्याशी या संदर्भात बोलतील. तर दुसरीकडे भाटीकर म्हणतात की अपक्ष म्हणून पुढे जाईन. अर्ज भरण्याअगोदर सुदिन ढवळीकर यांचे आशीर्वाद नक्कीच घेईन. दीपक ढवळीकर यांनी 'ते' विधान करून विधानसभा निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाटीकर यांनी जो पवित्रा घेतला त्यावरून त्यांचे ते वक्तव्य कदाचित चुकीचे होते, असे सर्वसामान्यांना वाटते. भाजपच्या नेत्यांनी मात्र सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी मुख्यमंत्री, भाजप प्रदेश अध्यक्ष तिकडे होते. दिल्लीतील महत्त्वाचे नेतेही त्यावेळी फोंड्यात होते.
काँग्रेसच्या गोटात आता चलबिचल सुरू झाली आहे. कारणे अनेक आहेत. भाजपने समजा रितेश नाईक किंवा विश्वनाथ दळवी यांना उमेदवारी जाहीर केली तर भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवार देण्याची संकल्पना पुढे येऊ शकते. काँग्रेस, आरजी, गोवा फॉरवर्ड हे सगळे पक्ष वेगळा विचार करताना एक भक्कम असा पर्याय भाजप समोर उभे करू शकतात. अशावेळी उमेदवारीबाबत सर्वात वर नाव असेल ते डॉ. केतन भाटीकर यांचेच.
सोशल मीडियावर भाटीकर यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. सारासार विचार करून भविष्यात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून ते पुढे आले तर आश्चर्य नाही. मागची ८ वर्षे जोमाने काँग्रेसचे काम पुढे नेलेल्या राजेश वेरेकर यांचे काय हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना साहजिकच पडेल. रवीनी काँग्रेस सोडल्यानंतर मरगळल्या काँग्रेसमध्ये जान आणण्याचे काम त्यानी केले आहे. २०२२ च्या निवडणुकीत अटीतटीची अशी लढत दिली आहे.
पक्ष निष्ठेचाही विचार
एका बाजूने डॉ. भाटीकर यांच्या पक्ष निष्ठेचा कस लागत असताना, दुसऱ्या बाजूने भाजपचे फोंड्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी यांच्याही पक्ष निष्ठेची कसोटी सुरू झाली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी भाजपचा एकनिष्ठ सेवक आहे. मागची अनेक वर्षे भाजपसाठी तन-मन लावून काम केले आहे. त्यामुळे पक्ष त्यांना नाराज करणार नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मते रितेश नाईक हे काल-परवा भाजपमध्ये आले आहेत. तर विश्वनाथ दळवी हे सुरुवातीपासूनच भाजप बरोबर आहेत. समजा उमेदवारी डावलण्यात आली तर काय भूमिका घेणार यावर मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.