चर्च संस्थेचा अहवाल व मासिकावर भाजपची प्रथमच जोरदार टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 19:29 IST2017-08-30T19:28:48+5:302017-08-30T19:29:11+5:30
चर्चच्या अधिकृत मासिकात प्रसिद्ध झालेला मजकुर याबाबत प्रदेश भाजपने बुधवारी प्रथमच जोरदार आक्षेप घेतला व टीका केली.

चर्च संस्थेचा अहवाल व मासिकावर भाजपची प्रथमच जोरदार टीका
पणजी, दि. 30 - चर्च संस्थेच्या सेंटर फॉर सोशल जस्टीस अॅण्ड पीस (सीएसजेपी) या विभागाने नुकताच प्रसिद्ध केलेला एक अहवाल आणि चर्चच्या अधिकृत मासिकात प्रसिद्ध झालेला मजकुर याबाबत प्रदेश भाजपने बुधवारी प्रथमच जोरदार आक्षेप घेतला व टीका केली.
भाजपचे प्रवक्ते आमदार निलेश काब्राल यांनी येथे पत्रकार परिषद घेतली व चर्चच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले. देशातील सध्याच्या राजवटीची नाझी राजवटीशी तुलना करणारा व हा देश फक्त दोन व्यक्ती सध्या चालवत आहेत अशा प्रकारची टीका करणारा लेख चर्चच्या मासिकात आहे. त्याचा संदर्भ देऊन काब्राल म्हणाले की गोव्यातील पोटनिवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करण्यात आला आहे.
मात्र ध्रुवीकरण होऊ शकले नाही. आर्चबिशपांनी याची दखल घ्यावी. आपण स्वतःही आर्चबिशपांना पत्र लिहीन. निदान बिशप कार्यालयातून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकातून तद्दन खोटे व भलतेसलते काही छापले जाऊ नये अशी भाजपची भूमिका असल्याचे काब्राल म्हणाले.
गोव्यात चर्चच्या क्रॉसची मोडतोड करण्याच्या ज्या काही घटना अलिकडे घडल्या त्याची चौकशी पोलिसांनी करून छडा लावला आहे. तरी देखील चर्चशीनिगडीत सीएसजेपी या संस्थेने निवडणुकीच्या तोंडावर जो कथित सत्यशोधन अहवाल सादर केला तो देखील दिशाभुलकारक व आक्षेपार्ह आहे. मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न त्यामागे होता. कथित सत्य शोधनाचा अधिकार सीएसजेपीला कुणी दिला असा प्रश्न काब्राल यांनी केला. चर्च संस्थेने मतदारांना चांगले काय व वाईट काय याविषयी मार्गदर्शन करावे पण सीएसजेपीसारखे विभाग ज्या कारवाया करत आहे ते बंद केले जावे. आपण देखील रोमन ख्रिस्ती धर्मिय आहे असे काब्राल म्हणाले.