नववर्षाच्या पहिल्या तीन दिवसात गोव्यात 1.36 लाखांचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:23 IST2018-01-04T16:23:50+5:302018-01-04T19:23:47+5:30
वर्ष 2017 मध्ये गोव्यात अंमली पदार्थाच्या प्रकरणांनी उच्चांक गाठला. नवीन 2018 सालही याला अपवाद नसल्याचे मागच्या तीन दिवसात दिसून आले आहे.

नववर्षाच्या पहिल्या तीन दिवसात गोव्यात 1.36 लाखांचा गांजा जप्त
सुशांत कुंकळयेकर
मडगाव : वर्ष 2017 मध्ये गोव्यात अंमली पदार्थाच्या प्रकरणांनी उच्चांक गाठला. नवीन 2018 सालही याला अपवाद नसल्याचे मागच्या तीन दिवसात दिसून आले आहे. छोटया गोव्यात पहिल्या तीन दिवसांतच ड्रग्सची तीन प्रकरणे उघडकीस आली असून 1.36 लाखांचा गांजा पकडण्याबरोबरच पोलिसांनी एकूण चार जणांना अटक केली आहे.
बुधवार 3 जानेवारी रोजी मडगाव पोलिसांनी मडगाव उद्यानात महमद रफीक या मूळ कर्नाटकातील युवकाला अटक करुन त्याच्याकडून 42 हजार रुपयांचा गांजा पकडला होता. सदर आरोपी जरी कर्नाटकातील असला तरी मडगाव रेल्वे स्थानक परिसरात रहात होता. मडगावच्या उद्यानात सर्रास अंमली पदार्थ विकले जातात अशी माहिती मडगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मागचा आठवडाभर या उद्यानात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्तावरील पोलिसांनी केवळ संशयावरुन सदर आरोपीला हटकले असता त्याच्याकडे हा माल सापडला.
अशीच घटना 2 जानेवारी रोजी पणजीला घडली होती. गस्तीवर असलेल्या ट्रॅफीक पोलिसांना चुकविण्याच्या नादात श्रीशंकर राठोड (22) व महमद नदाफ (23) हे दोन युवक मोटरसायकलवरुन घसरुन पडले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडेही 80 हजाराचा गांजा सापडला होता.
त्याच दिवशी मडगावच्या कदंब बस स्थानकावर फातोर्डा पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रद्युमकुमार (22) या उत्तर प्रदेशच्या आरोपीकडे 12 हजाराचा गांजा सापडला होता. मिळत असलेल्या माहितीप्रमाणो, गांजाचे हे लोण आता स्थानिकांर्पयतही पोचले असून स्थानिकांना हे अंमली पदार्थ पुरविण्यासाठी हे आरोपी वावरत असतात. विशेषत: शैक्षणिक आस्थापनांकडे अशी प्रकरणो वाढू लागली असून गोव्यासाठी ही चिंतेची बाब बनली आहे.