अग्निशामक दलाला १७९ कोटी रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश, १९४ माणसांचा जीवही वाचविला : संचालक नितीन रायकर
By समीर नाईक | Updated: April 14, 2024 16:53 IST2024-04-14T16:52:31+5:302024-04-14T16:53:28+5:30
अग्निशामक दलातर्फे रविवारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दीन साजरा करण्यात आला. यावेळी दलाचे संचालक नितीन रायकर यांनी उपस्थितांना संबोधताना ही माहिती दिली.

अग्निशामक दलाला १७९ कोटी रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश, १९४ माणसांचा जीवही वाचविला : संचालक नितीन रायकर
पणजी: अग्निशामक दलाने २०२३-२४ या वर्षात राज्यभरातील सुमारे १७९ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवली आहे. या वर्षात विविध घटनांचे ८००० कॉल्स अग्निशामक दलाला आले होते. तसेच याच घटनांमध्ये मिळून सुमारे १९४ माणसांना आणि ७५७ जनावरांना वाचविण्यात दलाला यश मिळाले आहे, अशी माहिती अग्नीशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.
अग्निशामक दलातर्फे रविवारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दीन साजरा करण्यात आला. यावेळी दलाचे संचालक नितीन रायकर यांनी उपस्थितांना संबोधताना ही माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलमेंट लिमिटेडचे प्रमुख संजीत रॉड्रिग्ज उपस्थित होते.
अग्निशामक दलाने आपले काम नेहमीच कर्तव्य आणि सेवा म्हणून केले आहे. राज्यात कोणतीही घटना घडली की त्वरीत घटनास्थळी पोहचत आम्ही गोष्टी नियंत्रणात आणल्या आहेत. सेवा बजावताना दलाचे अनेक जवान जखमी होतात, तर अनेकदा त्यांना जीव गमावावा लागतो. पण असे असताना आपले कर्तव्य करण्यास ते मागे पुढे पाहत नाही. जवानांच्या याच समर्पण भावामुळेच दलाने मोठी प्रगती केली आहे, असे रायकर यांनी यावेळी सांगितले.
लोकांनी आपली जबाबदारी ओळखावी: संजित रॉड्रिग्ज
राज्यात कुठेही कुठलीही घटना घडली की अग्निशामक दल सेवा देण्यास तत्पर असतात. परंतु अशा घटना होऊ नये यासाठी लोकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. घरातील सिलिंडर, वीज जोडणी बाबत लोकांनी माहिती ठेवणे आवश्यक आहे. कर्यायलाच्या ठिकाणी दलातर्फे जी आग विजवण्यासाठीची यंत्रणा दिली आहे, ती चांगल्या स्थितीत आहे की नाही याची माहिती संबंधितांना असणे आवश्यक आहे.
एवढंच नाही तर ती यंत्रणा कशी वापरावी याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींसाठी लोकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असे यावेळी संजित रॉड्रिग्ज यांनी सांगितले. आकडेवारी पाहता अग्निशामक दलाची गेल्या काही वर्षांचा प्रगती उल्लेखनीय आहे. दलाने आतापर्यंत चांगलीच कामगिरी केली आहे. पण भविष्याचा विचार करता नवीन आव्हाने असणार आहेत, काळानुसार आपल्या तांत्रिक गोष्टीत बदल करत नव्या कल्पना घेऊन या आव्हानांना दलाला तोंड द्यावे लागेल, यासाठी दलाने आतापासूनच तयारीला लागावे, असेही रॉड्रिग्ज यांनी सांगितले.