हरमल येथे स्टोअर रूमला आग लागून १७ लाखांचे नुकसान
By Admin | Updated: July 22, 2014 07:31 IST2014-07-22T07:30:02+5:302014-07-22T07:31:14+5:30
हरमल : येथील खालचावाडा बाखिया भाटात एका स्टोअररूमला शनिवारी १९ रोजी पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याने अंदाजे १७ लाखांचे नुकसान झाले.

हरमल येथे स्टोअर रूमला आग लागून १७ लाखांचे नुकसान
हरमल : येथील खालचावाडा बाखिया भाटात एका स्टोअररूमला शनिवारी १९ रोजी पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याने अंदाजे १७ लाखांचे नुकसान झाले. पूर्ववैमनस्यातून ही आगीची घटना घडली असावी, असा अंदाज असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबत माहिती अशी, १९ रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास किनारपट्टीत बाखिया भाटात शॅक्स, हट्स व्यावसायिक विनायक कुडव यांच्या स्टोअररूमला अज्ञाताने आग लावल्याने संपूर्ण ३० मी. लांब व १४ मी. रूंदीची स्टोअररूम व त्यातील सुमारे १७ लाखांचे किंमती सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. स्टोअररूममध्ये शॅक्स, हट्सचे बांबू, मॅट्स, डेकबेड, टेबल्स, खुर्च्या, उंची गाद्या, लाकडी पलंग, चादरी, किचन भांडी, सामान पाईप्स, काउंटर, वीज लॅम्पस, प्लायवुड्स, इटालियन वुड्स, खुर्च्या, प्लम्बिंग सामान असे अंदाजे १७ लाखांचे सामान जळून खाक झाले.
पर्यटन हंगामात सुमारे १५ हट्स व एक रेस्टॉरंट उभारलेले असते, त्याचे सामान व्यवस्थित आच्छादून प्रतिवर्षीप्रमाणे त्याच ठिकाणी ठेवले होते. गेल्यावर्षी पावसाळ्यात सुरूचे झाड पडून स्टोअररूमचा काही भाग जमीनदोस्त झाला होता, असे कुडव यांनी सांगितले. आगीच्या ज्वाला इतक्या दाहक होत्या की, अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविणेही कठीण झाले. अग्निशमन दलाची गाडी पोहोचण्यापूर्वी अर्ध्याअधिक सामानाने पेट घेतला होता. पेडणे व म्हापशाहून अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.
आगीत सॅनिटरी सामान, टबस्चा आवाज फुटल्यानंतर मोठ्याने ऐकू येत होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.
शिवाय भटवाडी येथून खासगी विहिरीचे पाणी दलाच्या जवानांनी आणले होते. पोलीस निरीक्षक लोटलीकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)