...अखेर इराणमधून सुटका
By Admin | Updated: January 20, 2015 02:14 IST2015-01-20T02:11:36+5:302015-01-20T02:14:53+5:30
गोव्याचे दोघे अभियंते : चौदा महिन्यांनंतर झाली घरच्यांची भेट

...अखेर इराणमधून सुटका
पणजी : गोव्यातील पै काणे समूहाच्या पावर इंजिनिअरिंग (इंडिया) प्रा. लिमिटेड या उद्योगातील दोघा अभियंत्यांची चौदा महिन्यांनंतर अखेर इराणमधून सुटका झाली असून सोमवारी ते भारतात परतले.
संकेत दिनेशचंद्र पांड्या व महम्मद खान हे काणे यांच्या पावर इंजिनिअरिंग (इंडिया) प्रकल्पाचे अभियंते आहेत. संकेत हे बडोदा, तर महम्मद हे नवी दिल्लीतील आहेत. इराणमध्ये वजर जहान या कंपनीच्या १६ मेगावॅट वायू आधारित वीज प्रकल्पासाठी वीज साहित्य पुरविण्याचे काम पै काणे यांच्या पावर इंजिनिअरिंग लिमिटेडला मिळाले होते. संकेत व खान हे दोघे अभियंते हे साहित्य घेऊन इराणमध्ये गेले होते. तिथे त्यांच्यावर वजर जहान कंपनीने फसवणुकीचे व अन्य काही गंभीर आरोप केले. न्यायालयात खटलाही भरला गेला व त्यामुळे चौदा महिने दोघे अभियंते इराणमध्ये अडकून पडले.
पै काणे कंपनीने त्याविरुद्ध कायदेशीर लढा दिला व या दोघाही अभियंत्यांची आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर पोहचले. नंतर त्यांनी आपले घर गाठले. चौदा महिन्यांनंतर दोघे स्वत:च्या कुटुंबास येऊन मिळाल्याचे पावर इंजिनिअरिंग कंपनीचे मालक अतुल पै काणे यांनी सोमवारी सायंकाळी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र सरकारच्या यंत्रणा, गोवा सरकार, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, तसेच भारतातील इराणचे राजदूत आदी अनेकांनी मोलाचे सहकार्य केल्याने आमचा संघर्ष यशस्वी झाला, असे काणे यांनी सांगितले.
संकेत व महम्मद यांना एकही रात्र तुरुंगात राहावे लागले नाही. त्यांना न्यायालयीन खटल्यांमुळे इराणबाहेर जाता येत नव्हते. चौदा महिने त्यांना एका तारांकित हॉटेलमध्ये राहावे लागले. तिथे राहून ते बरेच काही शिकले. महम्मद हा पोहायला शिकला, असे काणे यांनी सांगितले.
इराण देशातील लोक खूप चांगले आहेत. आम्ही त्या देशाशी असलेले आमच्या कंपनीचे व्यापार संबंध तोडणार नाही. आमच्या अभियंत्यांवर ज्या कंपनीने खोटे आरोप केले, त्यांच्याशी आम्हाला संबंध ठेवायचे नाहीत. ती कंपनी आमच्याकडून पैसे उकळू पाहत होती, असे काणे म्हणाले. आमच्याजवळ एकूण ४०० कर्मचारी असून विविध देशांमध्ये आमचे कर्मचारी फिरतात; पण कधीच अशा प्रकारचा अनुभव कधी आला नव्हता, असे काणे यांनी सांगितले.
(खास प्रतिनिधी)