राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 08:49 AM2023-11-21T08:49:16+5:302023-11-21T08:50:17+5:30

शानदार सोहळ्याद्वारे 'इफ्फी'चे उद्घाटन, सिनेरसिकांना अनोखी पर्वणी

filmcity will be built in the goa state said cm pramod sawant | राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने

राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. २०) ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दिमाखात व मोठ्या जल्लोशात उद्घाटन सोहळा पार पडला. 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित हिने नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच शाहीद कपूर, नुसरत बरुचा, श्रेया सरन यांनी नृत्य सादर करत लोकांना मंत्रमुग्ध केले. गायक सुखविंदर सिंग व श्रेया घोषाल यांनीही गीत सादर करत लोकांना आपल्या तालावर थिरकवले. दरम्यान, गोवा मनोरंजन संस्थेने फिल्म सिटीसाठी प्रस्ताव मांडला असून, लवकरच गोव्यात फिल्म सिटी होणारच, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, दिग्दर्शक करण जोहर, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, सभापती रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मंत्री सुभाष फळदेसाई तसेच आमदार, राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. अभिनेता अपारशक्ती खुराना, अभिनेती करिश्मा तन्ना यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले. गोव्यात आलेल्या देशी-विदेशी प्रतिनिधींनी इफ्फीचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

महोत्सवात सात कोंकणी चित्रपट दाखवणार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २००४ सालापासून गोव्यात इफ्फीचे आयोजन केले. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. समाजाचे चित्रण चित्रपटांतून होते. दरवर्षी राज्यातील कोंकणी चित्रपट इफ्फीत दाखविण्यात येतात आणि यावर्षी कोकणी
विभागासाठी ७ चित्रपट निवडण्यात आले असून, ते महोत्सवात दाखविण्यात येतील. गोवा मनोरंजन संस्थेने फिल्म सिटीसाठी प्रस्ताव मांडला असून, लवकरच गोव्यात फिल्म सिटी होणारच, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी उद्‌घाटन सोहळ्यावेळी सांगितले.

'कसे आसात...' : माधुरी दीक्षित

या महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या माधुरी दीक्षित यांनी 'कसे आसात... असे म्हणत गोमंतकीयांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, मी ३८ वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले आहे. मला योग्यवेळी आणि चांगली संधी मिळाल्याने आज मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले, लोक गोव्यात सुट्टीनिमित्त गोव्यात येतात, आता बहुतांश लोक इफ्फीसाठी आवर्जून येतात, असेही त्या म्हणाल्या.

आठ दिवस राज्य इफ्फीमय...

सोमवारी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर थाटात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. आता सलग आठ दिवस चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सोहळा राज्यात होणार आहे. या सोहळ्याला सिने अभिनेता आणि अभिनेत्रींची खास उपस्थिती हेच नेहमी आकर्षण राहिले आहे. त्याचप्रमाणे दर्जेदार चित्रपटांची मेजवानी येथे सिनेरसिकांना मिळणार आहे. यंदाही अशीच अपेक्षा ठेवत सिनेरसिकांनी गर्दी केली आहे. इफ्फीनिमित्त राजधानी सजवण्यात आली आहे. मांडवी तीर ते दिवजा सर्कल, गोवा मनोरंजन संस्था ते मीरामारपर्यंत विद्युत रोषणाई केली आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्थेच्या समोरच नवीनच तयार केलेला योगसेतूही सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

'कॅचिंग डस्टरने उघडला पडदा

५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पहदा कॅचिंग डस्ट या ब्रिटिश चित्रपटाने उघडला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रतिनिधींची गर्दी झाली होती. तिकीट मिळविण्यासाठी लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. स्टुअर्ट गडू यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, याच वर्षी हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दिग्गज कलाकार उपस्थित

यंदाच्या इफ्फीत अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक मधुर भंडारकर, के. के. मेनन, मेनन, बोनी कपूर, गुलशन ग्रोव्हर, अल्लू अर्जुन, कार्तिकी गोन्साल्विस हे कलाकार सहभाग घेतील. मायकल डग्लस, बिलटी मेंडोझा, बेंडन गाल्विन हे विदेशी कलाकार, उ‌द्घाटनाला माधुरी दीक्षित, सनी देओल, शाहीद कपूर, सारा अली खान व इतर कलाकार आले होते.

सात हजार प्रतिनिधींची नोंदणी

यंदाच्या इफ्फीला आतापर्यंत ७ हजारांहून अधिक प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. एक दिवसाचा विशेष पासही देण्याची सोय गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रवेशद्वाराकडे केली आहे. गोमंतकीय आणि पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

चित्रपटांचा आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो. तसेच आपल्या संस्कृतीचे दर्शनही चित्रपटांच्या माध्यमातून होते. चित्रपटसृष्टीचा वाढता कल पाहता भविष्यात काही वर्षांनी मीडिया क्षेत्र आणि भारताची अर्थव्यवस्था जगात तिसन्या क्रमांकावर पोहोचेल, तसेच भारतात चित्रपट करण्यासाठी आंतराष्ट्रीय चित्रपटांना अनुदान दिले जाईल. तसेच विविध सुविधा दिल्या जातील. - अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार, क्रीडामंत्री.

 

Web Title: filmcity will be built in the goa state said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.