गळ्यापर्यंतच्या भागाचे चित्रीकरण
By Admin | Updated: April 10, 2015 02:00 IST2015-04-10T01:59:52+5:302015-04-10T02:00:08+5:30
पणजी : ‘फॅब इंडिया’च्या कांदोळी येथील शोरुममधील छुप्या कॅमेऱ्यातून ट्रायल रुममधील व्यक्तींचा गळ्यापर्यंतचा भाग टिपला जात होता

गळ्यापर्यंतच्या भागाचे चित्रीकरण
पणजी : ‘फॅब इंडिया’च्या कांदोळी येथील शोरुममधील छुप्या कॅमेऱ्यातून ट्रायल रुममधील व्यक्तींचा गळ्यापर्यंतचा भाग टिपला जात होता, असे फुटेजवरून स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केल्यानंतर सीआयडीकडूनही त्याला पुष्टी देण्यात आली. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी छुपा कॅमेरा पकडल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक भाजपा आमदार मायकल लोबो यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे.
‘फॅब इंडिया’चे पदाधिकारी व कॅमेरे बसविणारी एजन्सीही चौकशीच्या फेऱ्यात आहे. कॅमेरे बसविण्याचे कंत्राट दिलेल्या बंगळुरूच्या एजन्सीचीही चौकशी झाली आहे. एजन्सीने कॅमेऱ्यांची दिशा ट्रायल रुमकडे ठेवली नव्हती व नंतर कोणीतरी हेतुपुरस्सर ती बदलल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.
‘फॅब इंडिया’च्या संशयित सात कर्मचाऱ्यांना म्हापसा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. संशयितांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यावर २३ एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे. तोपर्यंत संशयितांना अटक करण्याची मुभा पोलिसांना असेल; परंतु अटक झाल्यास २४ तासांच्या आत त्यांना १० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन द्यावा लागेल.
या आस्थापनाचे व्यवस्थापक संचालक विलियम डायसेल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रता दत्ता, विभागीय व्यवस्थापक रुचिरा पुजारी, कुंदन गुप्ता, अरुण नायकार व आशिमा अगरवाल यांना सत्र न्यायालयात उभे केले. त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला. पुढील सुनावणी येत्या २३ रोजी होणार आहे. या वेळी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आला असता उत्तर देण्यासाठी पोलिसांना १५ दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी सरकारी वकील अनुराधा तळावलीकर यांनी न्यायाधीशांकडे केली. (प्रतिनिधी)