१९ लाखांना लुटणारे तोतया अधिकारी जेरबंद; ईडीचे अधिकारी व मुंबई पोलिस असल्याचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2024 08:11 IST2024-04-06T08:10:32+5:302024-04-06T08:11:18+5:30
तपासात त्यांच्या एका बँक खात्यात १९ लाख रुपये असल्याचे समजले आहे.

१९ लाखांना लुटणारे तोतया अधिकारी जेरबंद; ईडीचे अधिकारी व मुंबई पोलिस असल्याचा बनाव
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ईडीचे अधिकारी व मुंबई पोलिस असल्याचे भासवून आयटी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला तब्बल १९ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी गोवापोलिसांच्या सायबर विभागाच्या पथकाने दोघाजणांना अटक केली आहे.
रवींद्र नंदनीया व विमल देर, अशी अटक केलेल्यांची नावे असून ते दोघेही गुजरात येथील आहेत. या प्रकरणातील तक्रारदार हे दोनापावला येथील रहिवासी असून ते सध्या 'वर्क फ्रॉम होम' करीत आहेत. गंडा घालण्याचा हा प्रकार मार्च महिन्यात झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ते पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनीया आणि विमल देर यांनी तक्रारदाराशी मोबाईलव्दारे संपर्क साधला. आम्ही मुंबई पोलीस आणि ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदाराला आधारकार्डच्या आधारे एका व्यक्तीने मोबाईल सीमकार्ड खरेदी करून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितले. या प्रकरणी तुमच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, असे या संशयितांनी तक्रारदाराला सांगितले.
या संशयितांनी तक्रारदाराशी मुंबई पोलिसांच्या गणवेशात व्हिडिओ कॉल केला. प्रकरणातून सुटका हवी असल्यास काही रक्कम जमा करा, असे सांगितले. तक्रारदाराने विविध बँक खात्यांमध्ये १९ लाख रुपये जमा केली. या प्रकरणी उपनिरीक्षक पीएसआय सर्वेश सावंत तपास करत असून पथकात हेमंत गावकर, सिद्रामय्या मठ यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक आशिष शिरोडकर व पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
धमकी अस्त्र...
सायबर गुन्हेगार आपण ईडी, सीबीआय तसेच राज्य पोलिस गुन्हे शाखा यासारख्या एजन्सींमधील असल्याचे सांगून आपल्या जाळ्यात लोकांना ओढतात. म्हणून तोतयागिरी करतात. मनी लॉड्रिग आणि अंमली पदार्थांच्या तस्करी सारखा गुन्हा दाखल असल्याची बतावणी करतात, अनेकदा फसव्या नोटीसही पाठवतात. बनावट गणवेश परिधान व्हिडीओ कॉल करून पीडितांना आणखी धमकावले जाते.
सतर्क राहा
लोकांनी नेहमी लक्षात ठेवावे की सरकार व कायद्याची अंम- लबजावणी करणारी विविध खाती लोकांना संपर्क करून गुन्ह्यांबद्दल सांगत नाही. त्यामुळे लोकांनी अशा प्रकारे कोणी संपर्क केल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्थानकात माहिती द्यावी. तसेच तक्रार करण्यासाठी १९३० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हा १५ व १६ मार्च रोजी झाला. मात्र त्यानंतर आपण फसवलो गेल्याचे समजताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुजरात येथून दोन्ही संशयितांना अटक केली. तपासात त्यांच्या एका बँक खात्यात १९ लाख रुपये असल्याचे समजले आहे.