लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी सत्यशोधन समितीचा अहवाल आज, गुरुवारी मिळणार असून तो प्राप्त झाल्यावर जनतेसाठी जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
३ मे रोजी पहाटे लईराईच्या जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू आणि ७० हून अधिक जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महसूल सचिव संदीप जॅकिस यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती नेमली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत चेंगराचेंगरीतील मृतांना एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे केलेल्या यशस्वी हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय सैन्याचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, देशभरात २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रील करण्यात आले. गोव्यात दक्षिणेत मुरगाव व उत्तरेत तिसवाडी तालुक्यात युद्धाच्या प्रसंगी घ्यावयाच्या दक्षतेसंबंधी रंगीत तालिम घेण्यात आली. किनारी राज्य म्हणून गोव्यातील विमानतळ. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची आस्थापने, मुरगांव बंदर प्राधिकरण आणि राजधानी पणजी यासारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.'
आगामी विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येणार असलेला कॅग ऑडिट अहवाल, वित्त खाते अहवाल, विनियोग अहवाल आदी अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिनरल फाउंडेशन सेवेला प्रकल्प व्यवस्थापन युनिट म्हणून दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुदतवाढ देण्यात आली.
१५ जणांवर उपचार सुरू
शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी २१ जणांना गोमेकॉत उपचारार्थ दाखल केले होते. पैकी ६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून अद्याप १५ जणांवर उपचार सुरू आहेत. अत्यवस्थ स्थितीत दाखल केलेल्या गंभीर जखमींची स्थिती जैसे थे असल्याचे सूत्रांनी सांगितले.