'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:26 IST2025-05-16T07:25:40+5:302025-05-16T07:26:36+5:30

'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

explain the mhadei report demand rg and strong protests in front of nio office | 'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) तीन वैज्ञानिकांनी म्हादई वळविली तरी त्याचा गोव्यावर परिणाम होणार नाही, असा अहवाल सादर केला आहे. त्याचा राज्यभर विविध संघटनांकडून निषेध केला जात आहे. गुरुवारी (दि. १५) सकाळी रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षातर्फे 'टुगेदर म्हादई मूव्हमेंट' तर्फे एनआयओ कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संस्थेला हा अहवाल कोणी करायला सांगितला याविषयी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोज परब म्हणाले, 'म्हादई नदी वाचविण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा सुरू आहे. मात्र, एनआयओचे संशोधक डॉ. अनिल कुमार, डी. शंकर, के. सुप्रित यांनी कार्यालयात बसून याबाबतचा अहवाल तयार केला आहे. त्यांना एक तर केंद्र सरकार किंवा कर्नाटक सरकारचा दबाव आल्याने अशा प्रकारचा अहवाल तयार केला असावा. अहवाल करताना स्थानिक सरकार, प्रशासन, म्हादईविषयी लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना का विश्वासात घेतले नाही? तसे न झाल्यानेच हा अहवाल चुकीचा ठरतो.

स्थानिक संशोधक, कार्यकर्त्यांचा लढा वाया

परब म्हणाले, गेली अनेक वर्षे याविषयी सर्वोच्च न्यायालयामार्फत हा लढा सुरू आहे. राजेंद्र केरकर, निर्मला सावंत डॉ. नंदकुमार कामत, अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हा लढा सुरू केला आहे. आम्ही आरजी पक्षातर्फे टुगेदर म्हादई मूव्हमेंट सुरू केली. सत्तरीत पदयात्रा सुरू केली. पण, सरकारने आमच्याविरोधात खोट्या तक्रारी करून पदयात्रा बंद पाडली. भाजप सरकारला म्हादई कर्नाटकला द्यायची आहे. म्हणून ते आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेत आहेत.

गावागावात जाऊन जागृती करू : आमदार बोरकर

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, म्हादईसाठी आता आरजी पक्षाच्या वतीने गावागावात जाऊन जागृती करू. सरकारने म्हादई लढ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण अजून त्यांना यश आलेले नाही. आता एनआयओच्या वैज्ञानिकांनी कार्यालयात बसून हा चुकीचा अहवाल सादर केला. तो राज्याच्या विरोधात आहे. याविषयी लोकांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. वैज्ञानिकांनी त्यांची चूक दाखवून दिली पाहिजे. आरजी पक्ष याविषयी शांत बसणार नाही. टुगेदर फॉर म्हादई मूव्हमेंट पुन्हा सुरू करून याविषयी जागृती करू.

अहवाल कर्नाटकधार्जिणा

मनोज परब म्हणाले की, हा अहवाल फक्त कर्नाटकाच्या बाजूने दिला आहे. याविषयी आम्हाला योग्य स्पष्टीकरण पाहिजे. त्यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे. हे तिन्ही वैज्ञानिक राज्याबाहेरील आहेत. गोव्यात राहून, म्हादईचे पाणी पिऊन त्यांनी म्हादई विरोधातच गद्दारी केली अशी आमची भावना आहे.
 

Web Title: explain the mhadei report demand rg and strong protests in front of nio office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.