'विश्वकर्मा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा': नरेंद्र सावईकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 08:33 IST2023-11-18T08:32:58+5:302023-11-18T08:33:18+5:30
शिरोडा बाजारातील कार्यालयातून नवीन नोंदणीस प्रारंभ.

'विश्वकर्मा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा': नरेंद्र सावईकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: विश्वकर्मा या योजनेचा गोव्यातील पारंपरिक व्यावसायिकांनी नावनोंदणी करून लाभ घ्यावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी केले.
शिरोडा मतदारसंघाचे प्रभारी आणि पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे प्रमुख माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी शिरोडा बाजारातील भाजपा कार्यालयातून नवीन नोंदणी व प्रमाणपत्र देऊन प्रारंभ केला. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी समोर ठेवून समाजातील सर्व घटकांचा विचार करून पंतप्रधान विश्वकर्मा ही योजना सुरू केली आहे, असेही सावईकर म्हणाले. त्यांच्यासोबत कार्यक्रमात शिरोडा पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, पंच रेश्मा नाईक, भाजपा मंडळ अध्यक्ष सुरज नाईक, सचिव अवधूत नाईक, पंच मेघशाम शिरोडकर, पंच चंदन शिरोडकर तसेच मडकई भाजप मंडळाचे अध्यक्ष संतोष रामनाथकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या विश्वकर्मा योजनेविषयी माहिती देताना सूरज नाईक यांनी सांगितले की, योजनेच्या अंतर्गत पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी या योजनेच्या अंतर्गत पाच दिवसांचे प्रशिक्षण वर्ग फर्मागुडी फोंडा येथे देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना पाच दिवस सुमारे अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये खर्च देण्यात येईल. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असेही नाईक यांनी सांगितले.
योजनेची नोंदणी करण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, फोटो, बँकविषयी माहिती, बँक खाते क्रमांक, उत्पन्न प्रमाणपत्र आदी याविषयी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. स्वागत भाजपा मंडळ अध्यक्ष सूरज नाईक यांनी केले. सचिव अवधूत नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.
- हे प्रशिक्षण वर्ग घेतल्यानंतर त्या व्यक्तीला आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी लागत असलेले साहित्य, मशीन खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येतील. तसेच १ लाख रुपये ४ टक्के व्याजानुसारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- या प्रशिक्षण वर्गात व पारंपरिक व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांनी सीएससी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी व ही नोंदणी झाल्यानंतर अर्ज केलेल्या व्यक्तींना प्रशिक्षणासाठी फोन करून माहिती देण्यात येणार आहे.